भू संपादन विरोध, नितीन गडकरींकडून उद्धव ठाकरेंची मनधरणी

भू संपादन विधेयकासंदर्भात शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भू संपादन विधेयकासंदर्भात उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली.

Updated: Feb 28, 2015, 08:09 AM IST
भू संपादन विरोध, नितीन गडकरींकडून उद्धव ठाकरेंची मनधरणी title=
छाया - डीएनए

मुंबई : भू संपादन विधेयकासंदर्भात शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भू संपादन विधेयकासंदर्भात उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली.

केंद्र सरकारने संसदेत सादर केलेले भूसंपादन विधेयक शिवसेनेच्या विरोधामुळे अडचणीत सापडले आहे. म्हणूनच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रात्री उशिरा ‘मातोश्री’ निवासस्थानी धाव घेतली आणि या विधेयकाला विरोध करू नका, पाठिंबा द्या, अशी मागणी करीत उद्धव ठाकरे यांची मनधरणी केली.

विधेयकास शिवसेनेचा असलेला विरोध लक्षात घेऊन तो दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे गडकरी यांनी दुपारीच पत्रकारांना सांगितले होते. उद्धव ठाकरे यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करू, असेही गडकरी म्हणाले होते. रात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि गडकरी यांच्यात भूसंपादन विधेयकावर विस्तृत चर्चा झाली.

चर्चेदरम्यान उद्धव ठाकरेंनीही विधेयकासंदर्भात काही सूचना केल्या असून त्यांचा विचार केला जाईल, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली. दरम्यान विधेयकाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून उद्धव ठाकरे आज पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.