वाद्यवृंदातून कलाकार देणार पंचमदांना सलामी

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत आणि प्रयोगशील संगीतकार अशी ख्याती असलेले संगीतकार आर.डी बर्मन उर्फ पंचमदा यांच्या संगीताची जादू पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता येणार आहे. 

Updated: Aug 18, 2016, 07:18 PM IST

 

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत आणि प्रयोगशील संगीतकार अशी ख्याती असलेले संगीतकार आर.डी बर्मन उर्फ पंचमदा यांच्या संगीताची जादू पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता येणार आहे. निमित्त आहे ते स्वरगंधार आणि स्वरदा कम्युनिकेशन आणि इव्हेंटस यांच्यातर्फे आयोजित "अल्टीमेट मेलोडीज ऑफ पंचम इन्स्ट्रुमेंटल'' या कार्यक्रमाचे.

शनिवारी 20 ऑगस्टला रात्री 8.30 वाजता विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमात बॉलीवूडमधील नावाजलेले 25 वादक यावेळी आपल्या वाद्यवृंदातून आरडींची गाणी सादर करतील.  
आर.डी यांनी शोले,यादो की बारात, मासूम, अमर-प्रेम, आराधना अशा ३०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले.आरडींची गाणी ऐकली की मनाला प्रसन्नता मिळते. त्यांनी संगीतात नेहमी वेगवेगळे प्रयोग करुन भारतीय संगीत अधिक समृद्ध केले. 

आर.डी यांच्या या अजरामर गाण्याचा खजीना या कार्यक्रमातून उलगडणार आहे. तबला, मेंडोलीन, ट्रोंबोन, ट्रम्पेट, पियानो, ऑक्टोपॅड, बेस गिटार, कॉंगो अशा विविध वाद्यवृंदाच्या सहाय्याने ही बहारदार गाणी सादर केली जातील. 

कार्यक्रमाचे आयोजन मंदार कर्णिक आणि उदय जोशी यांनी केले असून संगीत संयोजन अविनाश चंद्रचुड आणि आनंद सहस्त्रबुद्धे यांचे आहे. कार्यक्रमाचे निवेदन देखील आनंद सहस्त्रबुद्धे यांचेच आहे.  या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आर.डी यांच्या वादकांच्या टिममधील एक असलेल्या टोनी बाज यांनी वाजवलेली बास गिटार त्यांचे शिष्य मनीष कुलकर्णी वाजवणार आहेत. आर.डी. यांनीसंगीत दिग्दर्शन केलेल्या अनेक चित्रपटांतील संगीतासाठी ही गिटार वापरण्यात आली होती.  

बॉलीवूडमधले नावाजलेले 25 वादक वाद्यवृंदाद्वारे या कार्यक्रमातून पंचमदांना सलामी देणारआहे. मी स्वत: तुंबा हे वाद्य वाजवणार आहे.  त्याकाळी संगीतासाठी मर्यादित साधने असतानाही आरडी यांनी कमाल केली होती. काळानुसार संगीत क्षेत्रात अनेक बदल झाले.व्हायोलीन, कोंगो अशा काही वाद्ये हल्ली दिसत नाहीत. या वाद्यांची जादू या कार्यक्रमाद्वारे पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता येईल. 
 -अनुपम घटक, तुंगा वादक 

या कार्यक्रमात बॉलीवूडमधील नावाजेलेले 25 वादक आपल्या वाद्यवृदांतून आर.डी. यांची गाणी सादर करतील. हे वादक म्हणजे आपल्या वाद्यातून गाणारे गायकच असून कोणत्याही गायकापेक्षा ते कमी नाहीत. आर.डी यांच संगीत हे अजरामर आहे. त्यामुळे सर्वाधिक रिमिक्स गाणी त्यांच्याच गाण्यांवर तयार झालेली आहेत. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या सोबत असलेल्या वादकांनाही दिले. त्यांनी आपल्यासोबतच्या वादकांची साथ कधीच सोडली नाही. त्यामुळे बॉलीवूडमधील नावाजलेले 25 वादक आपल्या वाद्याद्वारे त्यांनी ही सलामी देतील. -  आनंद सहस्त्रबुद्धे, संगीत संयोजक