मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी डाळीचे दर १२० रूपये किलोवर आणण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिले होते. मात्र, अजूनही प्रत्यक्षात डाळ १३० ते २०० रूपयांपर्यंतच विकली जातेय.
वाढत्या महागाईला रोखण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरु केला तरी त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झालेला नाही. त्यामुळे २४ तासात डाळ आवाक्यात आणण्याचं शिवसेनेला दिलेलं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन फसलं की काय, अशी चर्चा सुरू आहे.
मंत्रिमंडळ बैठक सुरू झाल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रक सादर केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी डाळीचे भाव स्थिर ठेवून १२० रुपये दराने मुंबईसह राज्याती विक्री होईल, असे आश्वासन दिलं होते. मात्र, तसं काहीही झालेले नाही.
आज दिवसभरात विविध शहरात डाळ १३० ते २०० रुपये दराने विकली जात होती. दरम्यान, पुढच्या ४८ तासात डाळींचे भाव खाली येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी दिलीय. किरकोळ बाजारात डाळींचे भाव शंभर रुपये ठेवणार असून सर्व व्यापा-यांनी त्याला संमती दिल्याची माहिती त्यांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.