www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोबाईल चोरण्याच्या प्रयत्नात एका चोराकडून महिलेचा जीव गेला आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या डोंबिवलीच्या आरती घोलपकर यांची बॅग फिशिंग हूकद्वारे चोरण्याचा प्रयत्न केला जात असतानाच बॅग खेचली गेल्यामुळे घोलपकर यांचा तोल गेला आणि खांबावर डोकं आपटून त्यांचा मृत्यू झाला.
हार्बर मार्गावरील घणसोली आणि रबाळे या स्टेशन्सदरम्यान शुक्रवारी लोकलने प्रवास करताना घोलपकर यांची बॅग चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. फिशिंग हूकच्या सहाय्याने चोराने घोलपकर यांची हॅण्डबॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. या अचानक बसलेल्या हिसक्याने घोलपकर यांचा तोल गेला आणि रेल्वे रुळांजवळ असलेल्या पोलवर डोकं आदळून त्यांचा मृत्यू झाला.
घोलपकर जखमी अवस्थेत रुळांवर पडलेल्या असतानाही चोराने त्यांचं मंगळसूत्र चोरलं आणि त्यांच्या बॅगेमधील २६ हजार रुपयांचा ऐवज चोरला. संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.