मराठी भाषेच्या सन्मानार्थ सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर

 डॉ. सुभाष चंद्रा यांच्या 'द Z फॅक्टर - माय जर्नी अॅज द राँग मॅन अॅट द राइट टाइम' या मूळ इंग्रजी आत्मचरित्राच्या 'द Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास' या मराठी अनुवादाचे शुक्रवारी थाटामाटात प्रकाशन  

Updated: Mar 4, 2017, 01:58 PM IST
मराठी भाषेच्या सन्मानार्थ सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर title=

मुंबई : ख्यातनाम साहित्यिक, कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारीला महाराष्ट्रात 'मराठी भाषा दिवस' साजरा केला जातो... हेच औचित्य साधून मराठी भाषेवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय दिग्गज नेतेमंडळी शुक्रवारी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. हाच सुवर्णयोग साधत राज्यसभा खासदार आणि एस्सेल उद्योगसमूहाचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या 'द Z फॅक्टर - माय जर्नी अॅज द राँग मॅन अॅट द राइट टाइम' या मूळ इंग्रजी आत्मचरित्राच्या 'द Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास' या मराठी अनुवादाचे शुक्रवारी थाटामाटात प्रकाशन करण्यात आलं. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान म्हणून डॉ. सुभाष चंद्रा यांचे हे आत्मचरित्र मराठीत प्रकाशित करण्यात आले आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभा खासदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईतील 'आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेल'मध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम शुक्रवारी थाटामाटात संपन्न झाला.

मराठी सिनेमा आणि टीव्ही उद्योगातील मधूर भांडारकर, सोनाली कुलकर्णी, मनोज जोशी, सई ताम्हणकर, सुनील बर्वे, महेश कोठारे आणि सिद्धार्थ जाधव आदी सेलिब्रिटीही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.

डॉ. सुभाष चंद्रा यांच्या सर्वाधिक खपाच्या इंग्रजी आत्मचरित्राचे प्रकाशन जानेवारी 2016 मध्ये भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. याच आत्मचरित्राच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन सप्टेंबर 2016 मध्ये नोबेल पुरस्कार विजेते श्री. कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते पार पडले. देशातील उदयोन्मुख तरूण उद्योजक आणि विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा साकार करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरत आहे.


नितीन गडकरी आणि शरद पवार

शुक्रवारी संपन्न झालेल्या मराठी अनुवादाच्या प्रकाशन सोहळ्यात मराठी संस्कृती आणि मुंबई शहराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. सुभाष चंद्रा भाषणात म्हणाले की, 'हरियाणा ही माझी जन्मभूमी असली तरी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. तब्बल 35 वर्षे राजधानी मुंबईत वास्तव्याला असल्याने महाराष्ट्रीयन म्हणून मला स्वीकारण्यात आले आहे. मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. माझ्यासारख्या करोडो लोकांची स्वप्ने मुंबईत साकार होतात. आमच्या एस्सेल समूहाने नेहमीच मराठी संस्कृती जपण्यासाठी झी मराठी, झी टॉकीज, झी 24 तास अशा मराठी वाहिन्या सुरू केल्या. नटरंग, फँड्री, किल्ला, लय भारी, नटसम्राट आणि सैराट अशा अनेक दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती केली. या सुंदर शहराने नेहमीच मला प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला असून, त्याबद्दल मी कायम ऋणी आहे.'

'याच आठवड्यात 27 फेब्रुवारीला, ख्यातनाम मराठी साहित्यिक, कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. हेच औचित्य साधून 'द Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास' या माझ्या मराठी आत्मचरित्राचे प्रकाशन आज होत आहे. मराठी भाषा, संस्कृती, ओळख आणि परंपरेला माझ्याकडून हे छोटेसे योगदान आहे,' अशी पुस्तीही डॉ. चंद्रा यांनी यावेळी जोडली.

या मराठी पुस्तकाचे प्रकाशन करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले की, 'आयुष्यात धाडसी निर्णय केवळ मीच घेतो, असे मला वाटत होते. मात्र डॉ. सुभाष चंद्रांनी माझ्यापेक्षा दहा पटीने अधिक धाडसी निर्णय घेतले. त्यामुळेच ते आयुष्यात यशस्वी झाले. उद्योजकता, तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि संशोधन या चार गोष्टी त्यांनी आयुष्यात आत्मसाद केल्या आणि त्या जोरावरच हे साम्राज्य उभे केले. हिंमतीने प्रत्येक गोष्टींचा सामना करणारे आणि यश मिळवणारे असे ते बाजीगर आहेत.'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'जे आव्हानांना आव्हान देतात, तेच जीवनात मोठे होतात. सुभाष चंद्रा यांनी ते खरे करून दाखवले. जे कुणी करत नाही, ते करून दाखवण्याची प्रेरणा डॉ. सुभाष चंद्रांना मिळाली म्हणून ते आयुष्यात मोठे झाले. त्यांचे हे आत्मचरित्र तरूण उद्योजकांसाठी मार्गदर्शक आहे.'


सुभाषचंद्रा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले की, 'डॉ. सुभाष चंद्रांनी हातचे न राखता मैत्री केली आणि संघर्ष केला तो देखील टोकाचा. त्यांची मैत्री आणि त्यांच्यासोबत संघर्ष, अशा दोन्हींचा सामना मी केलाय. त्यांच्याशी संघर्ष झाल्यानंतर त्याचे फटकेही मी सहन केलेत. फारशी पार्श्वभूमी नसणाऱ्या क्षेत्रात ते गेले आणि संघर्ष करत यश मिळवले. आता राज्यसभेवरही ते निवडून आले असून, यापुढं ज्येष्ठांच्या सभागृहात ते ज्येष्ठांसारखे आम्हाला मार्गदर्शन करतील.'

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, 'फारसे शिक्षण घेतलेले नसतानाही माणूस आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे डॉ. सुभाष चंद्रा... केवळ १७ रूपयांपासून सुरूवात करून त्यांनी १७ हजार कोटी रूपयांचं उद्योग साम्राज्य उभं केलं. आता डॉ. सुभाष चंद्रा शोच्या माध्यमातून ते मॅनेजमेंट गुरू म्हणून तरूण उद्योजकांना आणि युवा पिढीला मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे हे मराठी आत्मचरित्र मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक म्हणून उपयोगी पडू शकेल.


सुभाषचंद्रा 

'डॉ. सुभाष चंद्रा यांचे 'द Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास' हे मराठी आत्मचरित्र राज्यातील सर्व आघाडीच्या बुक स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. 3 मार्च 2017 पासून फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया या ऑनलाइन स्टोअर्सवरही हे पुस्तक उपलब्ध आहे.