www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
आदिवासी भागात कुपोषित मुलं आढळणं, हे काही आपल्याला नवं नाही. पण आता आदिवासी भागात नाही तर चक्क देशाच्या आर्थिक राजधानीत... मुंबईत एक दोन नाही तर तब्बल ३० कुपोषित बालकं आढळली आहेत.
ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळी-भांडूप परिसरात नुसते कुपोषित नाही तर अतिकुपोषित ३० बालकं आढळली. तसंच १५ ते २० बालकं मध्यम कुपोषित असल्याचं निष्पन्न झालंय. भांडूपमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका मेडिकल कॅम्पमधून हे तथ्य समोर आलंय.
काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा भागांत कुपोषणानं अनेक बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातल्या इतर भागातही कुपोषित बालकं आढळली होती. पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारला जाबही विचारण्यात आला. यंदा आदिवासी बांधवांना खावटी कर्जाचं वितरण वेळेवर झालं नाही, याच मुद्द्यावर सरकारनं आता चौकशीचे आदेश दिले आहेत. कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतांनाच आता मुंबईतही ही समस्या असल्याचं स्पष्ट झालंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.