शिक्षकांबद्दल आदर ठेवायचा असेल, तर डोळे बंद करुन घ्या!

सध्या राज्यात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गाजतोय. या मुद्यावर शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलनही पुकारलं. पण मुंबईतल्या एका मुख्याध्यापकानं अतिरिक्त शिक्षकांच्या समस्येचा चांगलाच फायदा उचलला आहे.  

Updated: Jan 14, 2015, 11:17 PM IST
शिक्षकांबद्दल आदर ठेवायचा असेल, तर डोळे बंद करुन घ्या! title=

मुंबई: सध्या राज्यात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गाजतोय. या मुद्यावर शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलनही पुकारलं. पण मुंबईतल्या एका मुख्याध्यापकानं अतिरिक्त शिक्षकांच्या समस्येचा चांगलाच फायदा उचलला आहे.  

शाळा नावाच्या पवित्र वास्तूमधला निलाजरा गोंधळ आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. मुलं शाळेला जितक्या दांड्या मारत नसतील, त्यापेक्षाही जास्त दिवस शिक्षकांचा संप असतो. या संपाचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अतिरिक्त शिक्षकांना नियमित करा... राज्यभरात जवळपास ४५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरलेत. 

राज्य सरकारनं यावर तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांची यादी मागवली. कांदिवलीमधल्या बालक विहार शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कदम यांनी चार अतिरिक्त शिक्षकांची नावं पाठवली आणि बाहेर आला एक धक्कादायक घोटाळा. हे चारही शिक्षक या शाळेचे कर्मचारीच नाहीत. पहिला पाढा शाळेच्या बेशिस्तीचा.... पुढचा पाढा शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा..... शिक्षण विभागानं त्यापैकी एका शिक्षकाला दुसऱ्या शाळेत सामावूनही घेतलं.

जे शिक्षक शाळेत नाहीतच, त्यांना मलई आणि जे खरंच अतिरिक्त शिक्षक आहेत, त्यांच्यावरचा अन्याय कायम, असाच हा प्रकार झालाय. कारण हे चारही अतिरिक्त शिक्षक शाळेत आहेत, असं दाखवून त्यांच्या नावावर कुणीतरी पगारही लाटलाय. 

या प्रकरणी आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना जाब विचारण्यासाठी गेलो. तेव्हा मुख्याध्यापक सुट्टीवर गेले होते. पण संस्थाचालकांनी या प्रकरणाची दखल घेतलीय. 

आतापर्यंत पुढे आलेलं हे एक उदाहरण.... अशी किती उदाहरणं असतील..... हे त्या भ्रष्ट शिक्षण कारभाऱ्यांनाच ठाऊक... मुळात मुख्याध्यापकांना असली अफरातफर करताना लाज वाटली नाही का ? त्याही पुढे जात शिक्षण विभागाला अतिरिक्त शिक्षकांची पडताळणी करण्याची जराही गरज वाटली नाही का.... ? दरवर्षी पटपडताळणी काय आंधळेपणानं केली जाते का? त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे शिक्षणाचा धंदा करणारं हे मोठं रॅकेट शिक्षण विभागात आहे का? आणि असेल तर या धंदेवाईक कारभाऱ्यांवर कारवाई होणार का आणि कधी होणार? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांसमोर कसले आदर्श ठेवताय, याचं जराही भान नाही का?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.