मुंबई : भारतातून फरार असलेला मुंबई बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची मुंबईतील संपत्तीचा लिलाव आज सुरू आहे. या लिलावात दाऊदची कार ३ लाख २० हजार रुपयांना विकली गेलीय. दाऊदची कार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणि यांनी खरेदी केलीय. ही कार आपण 'जाळून टाकण्यासाठी' विकत घेतल्याचं त्यांनी म्हटलंय.
दाऊदच्या 'दिल्ली जायका' या रेस्टॉरन्टची किंमत १ करोड ९० लाख रुपये निर्धारित करण्यात आलीय. या लिलावसाठी सायंकाळा ५ वाजेपर्यंत बोली लागणार आहे. तर पाकमोडीया स्ट्रीट, नागपाडा, भायखळा इथल्या हॉटेल 'रौनक अफरोज'ची शेवटची बोली ४ कोटी २८ लाख रुपये लावण्यात आली होती.
या बोलीसाठी सरकारनं तीन प्रक्रिया ठेवल्यात. यासाठी पोलीस प्रशासनानंही कंबर कसलीय. या लिलाव प्रक्रियेत हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणीदेखील सहभागी झालेत.
दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याच्या बातम्यानंतर ज्येष्ठ पत्रकार एस बालाकृष्णन यांनी ती मालमत्ता विकत घेण्याची तयारी दाखवली. त्यामुळे, आपल्याला दाऊद आणि कुख्यात गुंड छोटा शकीलकडून धमकी आल्याचा दावा त्यांनी केलाय. त्याबाबतची तक्रार पोलिसांमध्ये करण्यात आली आहे. मात्र या लिलावातून माघार घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
भारत सरकारच्या कारवाईनंतर दुबईतही दाऊदच्या संपत्तीवर जप्ती सुरु झाली. त्यानंतर अन्य काही देशांमध्येही दाऊदच्या प्रॉपर्टीवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.