मुंबई : जन्माष्टमी म्हणजे कृष्णजन्माचा सोहळा. पण अलिकडच्या काळात जन्माष्टमी म्हणजे डीजेचा धांगडधिंगा आणि दहीहंडीच्या नावानं राजकीय आयोजकांचा धुडगूस अशीच ओळख नव्या पिढीला होते आहे. अशा वेळी संस्कृती जपत जन्माष्टमीचं खरं स्वरूप दाखवणारा स्वाध्याय परिवारातील युवान दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यांवर उतरला आहे.
एकीकडे दहीहंडीवरुन वाद-विवाद सुरु असतांना दुसरीकडे स्वाध्याय परिवारातील युवक कोणत्याही प्रलोभनाशिवाय, कोणताही भौतिक स्वार्थ वा अपेक्षेशिवाय केवळ आपली निपुणता, शक्ती आणि वेळ भगवंताच्या चरणी समर्पण करण्याच्या भावनेतून ही पथनाट्य दरवर्षी तेवढ्याच उत्साहाने करत असतात. या पथनाटय़ात भाग घेणारा प्रत्येक युवक आपले शिक्षण, नोकरी, धंदा हे सर्व सांभाळून आपल्या आयुष्यातला प्राईम टाईम काढून यात सहभागी होत असतो हे विशेष.
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले ज्यांना स्वाध्याय परिवार दादाजी असं देखील म्हणतात यांच्या विविध स्तरांवर चालणाऱ्या वैश्विक रचनात्मक कार्यात लाखोंचा युवावर्ग देखील मोठ्या प्रमाणात सहभागी आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सव, पथनाट्याच्या माध्यमातून आगळ्या रितीने साजरा करतात. गेली अनेक वर्ष हे युवक विचारांची हंडी सातत्याने फोडत आहेत. आज स्वाध्याय परिवाराची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या धनश्री तळवलकर तथा दीदींच्या मार्गदर्शनाखाली हे युवक यंदा दैवी संबंध म्हणजेच आपण सगळे एकाच देवाची लेकरे आहोत हा संबंध घेऊन पथनाट्याच्या स्वरुपात समाजापर्यंत जात आहेत.
भारतासह परदेशातही विविध भाषांमध्ये स्वाध्यायी युवक पथनाट्य सादर करत असतात. यंदा देखील २१ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान ही पथनाट्य सादर केली जाणार आहेत.
आजच्या काळात काही सन्माननीय अपवाद वगळता जन्माष्टमीला एक प्रकारचे विकृत वळण लागतं चाललंय. दहीहंडी फोडणे, तीही पैशांकरिता असेच जणू एक आज समीकरणच होऊन गेले आहे. अशा विपरीत काळातही स्वाध्याय परिवारातील पूजनीय दादांचे हे युवक जन्माष्टमीचा अर्थ केवळ दहीहंडी फोडणे, मौजमजा करणे एवढ्यावरच सिमीत न ठेवता श्रीमद्भगवद्गीतेने सांगितलेल्या हृदयस्थ भगवंतांच्या संबंध घेऊन, पूजनीय दादांचे विचार आणि कार्य घेऊन समाजातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
या पथनाट्यांचा उद्देश मनोरंजन, लोकजागृती करणं नसतो. पथनाट्याच्या माध्यमातून हे युवक समाजातील लोकांची समज वाढवण्याचा प्रयत्न करतात. पथनाट्य सादर करणारे हे युवक कदाचित नाटक करणारे यशस्वी कलाकार नसतील, पण आपण कशासाठी हे नाटक सादर करतो आहोत हे त्यांना नेमकं माहित असतं.
जीवन पथावर चालत असतांना आज माणूस इतका स्वार्थी झाला आहे की तो त्याचे संबंध गमावत चालला आहे. आजच्या समाजात माणूस एकटा तर पडत नाही आहे ना ? जर हो तर मग त्यातून मार्ग कसा निघेल. निस्वार्थ संबंध कसा तयार होईल ? यावर हे पथनाट्य आधारित आहे. एकीकडे आजच्या समाजात युवक अनेक प्रलोभनांमध्ये फसत असतांना स्वाध्याय परिवाराच्या या युवकांची ही कृती नक्कीच कौतुकास्पद आणि उल्लेख करण्यासारखी आहे.