www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हुंडा बळीच्या कायदा कितीही कडक केला तरी हुंड्यामुळं मृत्यू नवविवाहित तरुणींची संख्या आजही कमी नाही. नवी मुंबईत कामोठे इथं हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चटके देऊन, शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून नवरा वैभव शिर्के याला अटक केलीय.
नऊ महिन्यांपूर्वी सांगलीच्या रुपाली हिचं नवी मुंबईत राहणाऱ्या वैभव शिर्के याच्याशी लग्न झालं. सुखी संसाराची स्वप्न पाहत आपलं घर सोडून नव्या आयुष्याची सुरुवात करत असलेल्या रुपालीकडे वैभव फ्लॅट घेण्यासाठी आपल्या माहेरून पैसे आण असा तगादा लावला होता. रुपालीनं त्यास नकार दिल्यानं वैभवनं तिचा छळ करायला सुरुवात केलीय. रुपालीला मारहाण, चटके द्यायला त्याने सुरुवात केली. सुरुवातीला तिनं ही गोष्ट सहनही केली पण नंतर तिचा शारिरिक छळ वाढत गेल्यानं तिनं आपल्या बहिणीला ही गोष्ट सांगितली.
अखेर सततच्या जाचाला कंटाळून रुपालीनं गळफास लावला. आपलं जीवन संपवण्यापूर्वी तिनं सुसाईड नोट लिहली. त्यात तिनं आपल्या या निर्णयाचं कारण सांगितलं. रुपालीच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून, आपल्या मुलीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वैभवला फाशी देण्याची मागणी रुपालीच्या आई-वडीलांनी केलीय.
याप्रकरणी कामोठे पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोट आणि वडीलांच्या तक्रारी वरून वैभवला अटक करून त्याच्यावर खून आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत निकालही येईल पण हुंड्यासाठी दुसऱ्यांच्या मुलींचा जीव घेण्याची विकृती असलेले नराधम अजून या समाजात आहेत हे सत्य मान शरमेनं खाली घालायला भाग पाडतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.