Govinda Pistol Firing Case: अभिनेता गोविंदा मंगळवारी त्याच्याच घरामध्ये स्वत:च्या पिस्तूलमधून गोळी सुटल्याने जखमी झाला. परवाना असलेल्या पिस्तूमधील मिसफायर झाल्यानंतर गोविंदाला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. शस्त्रक्रिया करुन गोविंदाला घरी सोडण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही फोन करुन गोविंदाच्या प्रकृतीची चौकशी केली. गोविंदाच्या कुटुंबामध्ये या प्रकरणासंदर्भात संभ्रम दिसून येत आहे. गोविंदाकडे रिवॉलव्हर आहे की पिस्तूल याची कल्पना कुटुंबातील लोकांना नाही अशी माहिती समोर आली आहे.
ज्यावेळेस गोविंदा जखमी झाला तेव्हा त्याची पिस्तूल लोड केलेली होती. गोविंदा त्याच्या बॅगमध्ये ही पिस्तूल ठेवत असताना चुकून गोळी सुटली. बॅगमध्ये पिस्तूल ठेवताना ती खाली पडली आणि ट्रीगर दाबला गेल्याने सुटलेली गोळी गोविंदाच्या पायावर गुडघ्याखाली लागली. समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्या घरी तो वगळता इतर कोणीही हे शस्र वापरत नाही. गोविंदा गोळी लागल्याने जखमी झाल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या पायावर शस्रक्रिया करुन गोळी बाहेर काढण्यात आली असून सध्या त्याच्या पायाला काही टाके आहेत.
मात्र या प्रकरणानंतर डॉक्टरांनी जरी गोविंदाला डिस्चार्ज दिला असला तरी मुंबई पोलीस त्याला सहज क्लीन चीट देतील असं चित्र दिसत नाहीये. मुंबई पोलिसांचा या प्रकरणामध्ये तपास सुरु असून हा पूर्ण होईपर्यंत या प्रकरणातून गोविंदा सुटला असं म्हणता येणार नाही, असं एबीपी न्यूजने मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. गोविंदा घरामध्ये लोड केलेली पिस्तूल घेऊन का फिरत होता? याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रश्नाचं उत्तर गोविंदाला द्यावेच लागणार आहे.
गोळीबार झाल्याचा आवाज ऐकल्यानंतर त्याची मुलगी टीना ज्या रुममधून आवाज आला त्या दिशेने धावली. गोविंदाच्या घरी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने तातडीने मदतीसाठी फोन केला. त्यानंतर गोविंदाने स्वत: भावाला फोन केला. तसेच गोविंदाने स्वत: पत्नीला याबद्दल सांगितलं. त्याच्या मॅनेजरनेच यासंदर्भातील माहिती दिली.
गोविंदांनी रुग्णालयामधूनच आपल्या चाहत्यांसाठी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून संदेश जारी केला होता. त्याने सर्व चाहत्यांबरोबरच डॉक्टरांचेही आभार मानले. "नमस्ते, प्रणाम! मी गोविंदा बोलत आहे. मला गोळी लागली होती मात्र ती काढण्यात आली आहे. तुमचा आशिर्वाद, आई-वडिलांचा आशिर्वाद आणि गुरुंच्या कृपेने मी सुखरुप आहे. मी येथील डॉक्टरांचे खास करुन डॉक्टर अग्रवालजींचे आभार मानतो. तसेच तुम्ही लोकांनी ज्या प्रार्थाना केल्या त्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे," असं गोविंदा या संदेशात म्हणाला.