मुंबई : देशात साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असलेलं चित्र आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय. पण यंदा मात्र हे चित्र बदललेलं दिसतंय. उसाचं घटलेलं प्रमाण आणि दुष्काळाच्या झळा यामुळं यंदा साखरेचं उत्पादनात कमालीची घट झालीय. राज्यात गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत साखरेचं उत्पादन 375 लाख क्विंटल इतकं होतं. यंदा मात्र हे उत्पादन 280 लाख क्विंटलवर येवून पोहचलंय.
महाराष्ट्रामध्ये यंदा उसाची कमी झालेली लागवड आणि दुष्काळाचा बसलेला फटका यामुळे उसाचं क्षेत्र कमालीचं घटलंय. आतापर्यंत राज्यात 149 साखर कारखान्यांनी 261 लाख मेट्रिक टन उसाचं गाळप केलंय. मात्र हेच प्रमाण गेल्या वर्षी 354 लाख मेट्रिक टन एवढं होतं. म्हणजेच यंदा हे उत्पादन 93 लाख मेट्रिक टनानं घटलंय.
पावसाच्या अनियमिततेमुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हेक्टरी 25 ते 30 टक्के उत्पादन कमी झालंय. या सगळ्याचा परिणाम म्हणून राज्यात सध्या 149 साखर कारखानेच सुरू आहेत.
उसाच्या उत्पादनाची अशी परिस्थिती राज्यातल्या सर्वच विभागात पहायला मिळतेय. कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर या सातही विभागात साखरेचं उत्पादन कमालीचं घटलंय.
मराठवाड्यातल्या 17 कारखान्यांपैकी 4 कारखाने सुरू आहेत मात्र ते पूर्ण क्षमतेनं सुरू नाहीत. नांदेड विभागातल्या कारखान्यातून आत्तापर्यंत 9 लाख 77 हजार 79 मेट्रिक टन उसाचं गाळप झालंय. त्यातून 9 लाख 48 हजार क्विंटल साखरेचं उत्पादन झालं. तर औरंगाबाद विभागात एकूण 6 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालंय. यावेळचं गाळप आणि उत्पादन साखर कारखानदारीच्या काळातली निच्चांकी असल्याचं सध्यातरी दिसतंय.
उत्तर महाराष्ट्र, ऊस आणि साखर उत्पादनात राज्यात सर्वाधिक पिछाडीवर आहे... उत्तर महाराष्ट्रातल्या खान्देश विभागात कारखाने पूर्णत: बंद आहेत तर सहकारातील राजकारण आणि भ्रष्ट्राचारामुळे धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातले कारखानेही लयाला गेलेत. नाशिकच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नगर जिल्ह्यात 23 पैकी 16 कारखाने सुरु आहेत. यात 32 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय. उसाचं 33 लाख क्विंटल गाळप करण्यात आलंय.
गेल्या वर्षी गळीप हंगामात साखरेला साडेचोवीस रुपये एवढा भाव होता. पण यंदा हा भाव 34 ते 35 रुपयांवर जावून पोहचलाय. यंदा साखरेचं उत्पादन जरी घटलं असलं तरी देशातंर्गत बाजारपेठेला पुरेल एवढं साखरेचं उत्पादन झालंय.
सध्या देशात गेल्या हंगामातील 77 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. यंदाच्या हंगामात 230 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
अशी एकूण 307 लाख मेट्रिक टन साखर उपलब्ध होणारेय. यातली 250 लाख मेट्रिक टन साखर देशांतर्गत बाजारपेठेसाठी लागते. त्यामुळे पुढील हंगामात म्हणजेच 2017-18 साठी 57 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहते.
साखरेचं एकूण गणित पाहता महाराष्ट्रात साखरेचं उत्पादन घटलं असलं तरी देशात पुरेल इतका साखरेचा साठा आहे.. त्यामुळं केंद्र सरकारनं साखरेची निर्यात किंवा आयात करण्याची गरज नाही. अन्यथा साखरेचे भाव पडून पुन्हा साखर कारखानदार आणि पर्यायानं उस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील असं साखर अभ्यासकाचं मत आहे.