मुंबई : जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांना थायरॉईडची शस्त्रक्रिया करताना मोठं यश आलं आहे. जे.जे.च्या डॉक्टरांनी रुग्णाच्या गळ्याला न चिरता थायरॉईडची गाठ काढली आहे. महाराष्ट्रातील ही पहिली तर भारतातली ही दुसरी शस्त्रक्रिया आहे.
सुगंधा कुरडे या 75 वर्षांच्या वृद्ध महिलेला गेल्या दोन महिन्यांपासून घशाला त्रास होत होता. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला असता त्यांना जे.जे.मध्ये जायला सांगण्यात आलं. सुगंधा कुरडे जे.जे.मध्ये आल्यानंतर त्यांच्यावर इण्डोस्कोपिक सर्जरी करण्यात आली.
त्यांना झालेल्या गाठीचा आकार तोंडातून शस्त्रक्रिया करण्या योग्य असल्यानं अशा पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यात आलं. या शस्त्रक्रियेवेळी रुग्णाच्या तोंडावाटे भूल देण्यात आली, अशी माहिती जे.जे.च्या डॉक्टरांनी दिली आहे.
दक्षिण कोरियामध्ये अशाप्रकारच्या सर्जरी मोठ्या प्रमाणावर होतात. थायलंडमध्ये जगात पहिल्यांदा ही शस्त्रक्रिया झाली होती. याच शस्त्रक्रियेचा यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून एक वर्षानंतर जे. जे.मधील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली.