www.24taas.com, दिपाली जगताप, झी मिडिया, मुंबई
मानखुर्दमधल्या नुतन विद्यामंदीर या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय. शाळेच्या आवारात विद्यार्थ्याच्या बोटाचा एक भाग तुटलाय. शाळेच्या कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घ़डल्याचा आरोप पालकांनी केलाय.
मानखुर्दच्या नुतन विद्यामंदीर या शाळेत सातवीत शिकत असलेला हा प्रतिक बो-हाडे...सोमवारी मधल्या सुट्टीत शाळेच्या पटांगणात खेळताना त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. प्रतीकच्या सांगण्यानुसार प्राथमिक शाळेच्या महिला कर्मचा-यानं प्रतीकला पटांगणातला लोखंडी पाळणा बाजुला सरकवायला सांगितला. लोखंडाचा अवजड असलेला पाळणा हाताळताना प्रतिकच्या डाव्या हाताचं एक बोट या खेळण्याखाली चेपलं आणि त्या बोटाचा काही भाग बाजुला पडला.
प्रतिकच्या बोटाला टाके पडले असून त्याच्या बोटाला गँगरीन होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केलीय.
नूतन विद्यामंदिर या शाळेनं मात्र शहानिशा करुन मगच बोलणार असल्याचं सांगितलंय. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलीस पुढची चौकशी करतायत.
प्रतिकच्या बोटाची ही दुखापत आयुष्यभरासाठीची ठरू शकते.... या घटनेनंतर शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या पुन्हा ऐरणीवर आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.