www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`आई, मी आत्महत्या करतोय`, असे शब्द मातेच्या कानावर पडतात आणि फोन बंद होतो... आणि नंतर उमलत्या वयातल्या मुलाचं प्रेतच समोर येतं... अशा वेळी त्या मातेच्या आकांताची - आक्रोशाची कल्पनाही करवत नाही... पण, अशीच वेळ प्रत्यक्षात आली ती धारावीमध्ये राहणाऱ्या टेके कुटुंबावर....
धारावी क्रॉस रोड इथं राहणाऱ्या किशोर टेके यांचा १७ वर्षांचा मुलगा दीपेश हा माहीम इथल्या सरस्वती विद्यामंदिर शाळेत शिकत होता. दीपेशवर शाळेत चोरीचा आळ आला होता... त्यामुळे तो खूप तणावाखाली आला आणि त्याचमुळे त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप दीपकच्या वडिलांनी केलाय.
सोमवारी दुपारी दीपेश शाळेत गेल्यानंतर थोड्याच वेळात शाळेतून घरी फोन आला. आईनं फोन घेतल्यावर त्यांना तातडीनं शाळेत मुख्याध्यापिकांना भेटण्यासाठी बोलावण्यात आलं. यानंतर दीपेशचे वडील तातडीनं शाळेत जाऊन शिक्षकांची आणि मुख्याध्यापिकांची भेट घेतली. यावेळी, दीपेशवर खेळाचं प्रमाणपत्र चोरल्याचा आरोप करत शाळेनं दीपेशचं नाव शाळेतून काढा नाहीतर आम्ही काढून टाकू असं शाळेनं सांगितलं.
यावर, दीपेशच्या वडिलांनी दीपेशला समजावत तू घरी ये, त्यानंतर आपण काहीतरी मार्ग काढू असं सांगितलं... आणि ते शाळेतून निघून गेले...
पण, यानंतर दीपेश घरी आलाच नाही... घरी आला तो त्याचा शेवटचा फोन... फोनवरच त्यानं आईला `आई, खूप मानसिक त्रास होतोय... मी आत्महत्या करतोय` असं म्हटलं अन् दीपेशच्या आईच्या काळजाचा ठोकाच चुकला...
त्यानंतर, बातमी आली ती दीपेशच्या मृत्यूची... रेल्वे रुळ ओलांडताना लोकलचा धक्का लागून दीपेशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. माहीम रेल्वेस्टेशनवर अप जलद मार्गावर ही घटना घडली होती. अपघातानंतर दीपेशला नायर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण, इथं दीपकला मृत घोषित करण्यात आलं. शिक्षकांनी केलेल्या गैरवर्तवणुकीमुळे दीपेशनं आत्महत्या केल्याची तक्रार किशोर टेके यांनी केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.