एका पणजीची गोष्ट... आणि रेकॉर्डही!

घरात आजी असेल तर तिच्या तोंडून गोष्टी ऐकायला कुणायला आवडतं नाही..? पण आज आम्ही सांगणार आहोत एका आजींचीच गोष्ट... आजींची नाही, तर ९६ वर्षांच्या पणजीची गोष्ट...

Updated: Mar 30, 2015, 10:52 AM IST
एका पणजीची गोष्ट... आणि रेकॉर्डही! title=

मुंबई : घरात आजी असेल तर तिच्या तोंडून गोष्टी ऐकायला कुणायला आवडतं नाही..? पण आज आम्ही सांगणार आहोत एका आजींचीच गोष्ट... आजींची नाही, तर ९६ वर्षांच्या पणजीची गोष्ट...

आपल्या पणतीला गोष्ट सांगणाऱ्या या पणजी म्हणजे सुशिला पाठक... ५ मे १९१९ रोजी सुशीलाबाईंचा जन्म झाला... त्या आता ९६ वर्षांच्या आहेत. या वयात त्या आता एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड करतायत... काय, आश्चर्य वाटलं ना..? पण हे खरंय.

सुशिलाबाईंचा वर्ल्ड रेकॉर्ड असणार आहे तो सर्वाधिक वयाच्या असताना पुस्तक लिहिण्याचा... 'पणजीकडून खाद्यपदार्थांचा खजिना' हे पुस्तक ९६ वर्षाच्या सुशिला आजींनी नुकतंच प्रदर्शित केलं. यात १६३ खाद्यपदार्थांच्या पाककृती आहेत... आणि त्यांच्या या रेकॉर्डची नोंद लवकरच लिम्का बुकात होणार आहे. 

२००८ मध्ये त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं ते आपल्या पतवंडांसाठी... 'पणजीकडून गोष्टींचा खजिना'... त्यानंतर 'अगं अगं म्हणी' या पुस्तकात पूर्वांपार चालत आलेल्या अशा ३१९ म्हणींचा खजिना त्यांनी उलगडून सांगितला. या वयात पुस्तक लिहिण्याची ताकद आपल्या नातवंडांनीच दिल्याचं त्या सांगतात.

लग्नाआधी चौथी आणि लग्नानंतर सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सुशिला पाठक यांनी स्वातंत्र्यपूर्व स्वदेशी चळवळीत सहभाग घेतला होता. त्याकाळी विदेशी असलेल्या चहावर बहिष्कार टाकला तो आजतागायत... हीच शिकवण त्या आता आपल्या पणतीला देतात... साडे तीन वर्षांची तारीणी आपल्या पणजीकडून त्यांच्या पुस्तकातल्या गोष्टी वाचते, ऐकते...

आपल्या अनुभवांच्या गाठोड्यातून चार युक्तीच्या गोष्टी भावी पिढ्यांसाठी शब्दबद्ध करणाऱ्या सुशिला पणजीबाईंची ही गोष्ट... साठा उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.