मुंबई : भाजपामध्ये सध्या वादविवादांची बरसात सुरू आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी 'मन की बात' करत असताना, भाजपचे माजी मंत्री राज पुरोहित यांनी 'राज की बात' करत खळबळजनक गौप्यस्फोट केलेत.
तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले भाजपा नेते राज पुरोहित यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमधली राज पुरोहित यांची विधानं महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप आणण्यासाठी पुरेशी आहेत. यासोबतच भाजपामधला अंतर्गत कलहदेखील त्यामुळे चव्हाट्यावर आलाय. हा व्हिडिओ झी मीडियाकडे पाठवण्यात आलाय... याच्या वैधतेची कुठलाही हमी झी मीडिया देत नाहीय...
'कलेक्टिव्ह लीडरशिप केवळ मोदी-शाहांची'
भाजपामधल्या 'कलेक्टिव्ह लीडरशिपची' पोलखोल राज पुरोहित यांनी या व्हिडिओमध्ये केलीयं. पक्षामध्ये कलेक्टिव्ह लीडरशिप नावाची कोणतीही गोष्टच अस्तित्वात नसल्याचं पुरोहित सांगतायत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह निर्णय घेतात आणि नंतर इतरांकरवी ते मंजूर करून घेतलं जातं. भाजपामध्ये फंडिंग आणण्याचं कामही हेच दोघं जण करत असल्याचं पुरोहित यांनी म्हटलंय.
'काळा पैसा परत आणण्याची गरज नाही, व्होट बँक दूरावते'
एकीकडे पंतप्रधान काळा पैसा परत आणण्याची भाषा करत असताना हा काळा पैसा देशात परत आणण्याची काहीही गरज नसल्याचं राज पुरोहित यांचं मत आहे. मोदींच्या याच धोरणांमुळे भाजपाची सर्वात मोठी व्होट बँक नाराज होऊन दूर गेल्याचं ते म्हणतायत.
'मी खतरनाक आमदार'
राज पुरोहित स्वतःलाच खतरनाक आमदार म्हणतायत. तसंच दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे प्लान्स आपण पूर्ण करणार होतो, असंही ते म्हणतायत. स्वतःच्याच तोंडानं ते स्वतःला खतरनाक असल्याचं म्हणतायत.
'बिल्डर आमदार लोढांमुळेच...'
खरंतर आपल्याला मंत्री बनवलं गेलं नाही, याचं शल्य राज पुरोहित यांना आहे. भाजपामध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपण मंत्री न होण्याला आणखी एक पाच वेळा आमदार झालेले भाजपा नेते मंगलप्रभात लोढा कारणीभूत असल्याचं ते म्हणतायत.
भाजपाच्या प्रचारात बराच पैसा ओतणारे हे बिल्डर आमदार आहेत. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे पैसे याच बिल़्डर लोढानं हडप केल्याचं राज पुरोहित म्हणतायत. लोढा आमदार असल्याचा फायदा उठवून मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेमार्फत आपली कामं करून घेत असल्याचंही पुराहित सांगतायत.
'वसुंधरा राजेला मीच राजकारणात आणलं'
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाही राज पुरोहित यांनी सोडलेलं नाही. राजे यांना आपणच राजकारणात आणल्याचं ते या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतात. त्यांना मुख्यमंत्री व्हायला आपणच मदत केली, पण राजस्थानातून आपण लोकसभा लढण्याचा विषय आला, तेव्हा त्यांनी आपलं तिकीट कापलं, असं पुरोहित म्हणतायत. त्यांच्या मते आपल्यामुळे वसुंधरा राजे स्वतःला असुरक्षित झाल्याचं मानतात असंही पुरोहित म्हणालेत.
'दिल्ली विधानसभेत पक्षाला जाणूनबुजून हरवलं'
दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवाचंही राज पुरोहित यांनी विश्लेषण केलंय. एकीकडे या व्हिडिओमध्ये ते पक्षाच्या नेतृत्वावर टीका करतात, तर त्याच वेळी दिल्ली भाजपाच्या नेत्यांनी नियोजित पद्धतीनं भाजपाला हरवल्याचा खुलासाही ते करतात.
ब्राम्हणांसाठी अपशब्द
पूर्वी वरूण गांधी यांनी ज्याप्रमाणे मुस्लिमांबद्दल अपशब्द उच्चारले होते, तसंच आता राज पुरोहित म्हणतायत. ब्राह्मणांबद्दलही त्यांनी अपशब्द उच्चारलेत. हा शब्द इतका आक्षेपार्ह आहे, की तो आम्ही तुम्हाला ऐकवू शकत नाही.
राज ठाकरे बोगस
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही राज पुरोहितांनी टीका केलीय. राज ठाकरे हे बोगस नेता असल्याचं पुरोहित या व्हिडिओमध्ये म्हणतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.