मुंबई : ‘एचडीआयएल’ या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे एकापाठोपाठ एक कथित घोटाळे आता उजेडात येऊ लागलेत. गोरगरीब झोपडीवासियांची तसेच मध्यमवर्गियांची एचडीआयएल कशी फसवणूक करतेय, याची धक्कादायक उदाहरणं समोर येत आहेत.
बिल्डर व्यवसायातील एक बडं नाव म्हणजे एचडीआयएल... हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी... गोरगरीब झोपडीवासियांना पक्क्या घरांचं आमीष दाखवून त्यांनी अनेक एसआरए प्रोजेक्ट ताब्यात घेतले... मात्र, त्यापैंकी अनेक प्रकल्पांमध्ये कंपनीनं घोटाळे केल्याची बाब उजेडात आलीय.
२००५ आणि २००६ मध्ये वांद्रे येथील मोतीलाल नेहरू नगर स्लममध्ये कंपनीनं एसआरएची बिल्डिंग बांधली. मात्र, पात्र लोकांना अपात्र ठरवून त्यांना घरं नाकारण्यात आली. तर सरकारी अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून बोगस आणि अपात्र व्यक्तींना एसआरएची घरे विकली. याप्रकरणी हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर, कोर्टानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश अँन्टी करप्शन ब्युरोला दिले. त्यानुसार एचडीआयएल कंपनीचे प्रमुख राकेश वाधवान, कंपनीचे 10 संचालक, एसआरएचे तत्कालिन सीईओ उज्ज्वल ऊके आणि देवाशिष चक्रवर्ती यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एव्हढंच नव्हे, तर मुंबई विमानतळ परिसरातील झोपडीधारकांसाठीच्या एसआरए प्रकल्पाचे कंत्राटही एचडीआयएललाच देण्यात आलं होतं. मात्र, कंपनीच्या अनास्थेमुळे ९० हजार झोपडीवासियांना अजून हक्काची घरे मिळालेली नाहीत. घरे तयार असूनही त्यांचा ताबा दिला जात नाही. उत्तर मध्य मुंबईच्या भाजप खासदार पूनम महाजन यांनी याबाबत थेट लोकसभेतच आवाज उठवला.
हे कमी झाले म्हणून की काय, कुर्ला येथील प्रीमियम रेसिडेन्सी प्रकल्पातही एचडीआयएल कंपनीनं सुमारे २०० लोकांची फसवणूक केल्याचं आणखी एक प्रकरण उघडकीस आलंय. या लोकांनी आपली आयुष्यभराची कमाई फ्लॅट खरेदीसाठी गुंतवली. २०११ मध्ये त्यांना फ्लॅट देण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं. मात्र, २०१५ साल आलं तरी अजून त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. झोपडीवासीय असोत, नाहीतर सामान्य मुंबईकर, त्यांच्या घरांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या एचडीआयएलवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.