शिवसेनेचे भाजपला प्रत्युत्तर, आम्ही आमचा पर्याय शोधू : उद्धव ठाकरे

कल्याण-डोंबिवलीत सत्ता कोणाची येणार याची उत्सुकता असताना शिवसेनेने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. आम्ही ताणाताणी करणार नाही, मात्र, दानवे यांनी जो निर्णय घेतलाय त्यांचा तसा असेल तर आम्ही आमचा पर्याय शोधू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.

Updated: Nov 3, 2015, 07:19 PM IST
शिवसेनेचे भाजपला प्रत्युत्तर, आम्ही आमचा पर्याय शोधू : उद्धव ठाकरे title=

मुंबई : कल्याण-डोंबिवलीत सत्ता कोणाची येणार याची उत्सुकता असताना शिवसेनेने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. आम्ही ताणाताणी करणार नाही, मात्र, दानवे यांनी जो निर्णय घेतलाय त्यांचा तसा असेल तर आम्ही आमचा पर्याय शोधू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.

दानवेंचा दावा, भाजपचा महापौर

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक ५२ जागांसह मोठा पक्ष बनलेल्या शिवसेनेने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात. मात्र, केडीएमसीसह कोल्हापूरमध्येही भाजपचा महापौर बसवण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. हे उद्धव यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांचा निर्णय तसा असेल तर आम्ही आमचा निर्णय घेऊ. भाजपाला सेनेसोबत यायचे नाहीये, हे दानवेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. ते त्यांच्या मार्गाने जाणार असतील तर आम्ही आमच्या मार्गाने जाऊ, असे उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिलेय. 

कल्याण-डोंबिवलीकरांचे आभार

मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनात आमदारांची बैठक बोलवली होती. भाजप-शिवसेना यांच्यातील ताणलेल्या संबंधाबाबत उद्धव काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले होते. मात्र, उद्धव यांनी मीडियासमोर बोलताना सावध पवित्रा घेतला. आमदारांच्या विभागातील कामांबाबत चर्चेसाठी आजची बैठक घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणालेत. आम्हाला भरघोस मते दिल्याबद्दल कल्याण-डोंबिवलीकरांचे मीडियाच्या माध्यमातून प्रथम आभार मानतो, असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे आभार, डाळ १२० रुपये

महागाई नियंत्रणात आणण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेय. १२० रुपये किलो दराने डाळ देण्याचे मुख्यमंत्र्यानी आश्वासन दिलेय. तसेच शिवसेना मंत्री, आमदार यांची कामे करण्याचे आश्वासन दिल्याने मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असे उद्धव यांनी सांगितले. दरम्यान, कल्याण-डोबिंवली पालिकेत गेल्या दोन दशकापासून केलेल्या कामाची परंपरा राखू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सत्तेचं समिकरण कसं असणार?

एकूण आकडेवारीवर नजर टाकली असता १२२ पैकी १२० जागांचे निकाल हाती लागले आहेत. यातील २ जागांवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे शिवसेना- ५२ , भाजप- ४२, मनसे- ९, काँग्रेस- ४, राष्ट्रवादी - २ आणि इतर ११ जागा मिळविल्या आहेत. 

पहिलं समिकरण - शिवसेना- ५२ + मनसे- ९ + इतर ११ = एकूण ७२
 
दुसरं समिकरण - भाजप- ४२ +  मनसे- ९ + इतर ११  = एकूण ६१

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.