मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेकडून एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, यावेळी भाजपाच्या काही नेत्यांच्या वागण्याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली.
शिवसेना-भाजपामधील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी सरकारबद्दलची आणि भाजपच्या काही नेत्यांच्या वागण्याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणी निमंत्रण देण्यात आले, त्यावरूनही शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. असे प्रकार टाळण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजतंय.
यापुढे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेशी संबंधित विषयात स्वतः लक्ष घालावे, अशी मागणीही शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करत यापुढे असे प्रकार टाळण्याचं आश्वासन दिल्याचं समजतंय. एकूणच मागील दोन दिवस आक्रमक असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली तलवार म्यान केल्याचं बोललं जातंय. शिवसेना सत्तेत राहणार की नाही ही चर्चा मागील दोन दिवस राज्यात सुरू होती, त्याला या भेटीने पूर्णविराम दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.