संजय दत्तसाठी 'फर्लो'ची स्पेशल शक्कल...

मुंबई पोलीस, जेल प्रशासन आणि राज्य सरकारने मिळून अभिनेता संजय दत्तसाठी आता एक नवीन कायद्यातील पळवाट काढलीय. 

Updated: Jan 9, 2015, 09:46 AM IST
संजय दत्तसाठी 'फर्लो'ची स्पेशल शक्कल... title=

मुंबई : मुंबई पोलीस, जेल प्रशासन आणि राज्य सरकारने मिळून अभिनेता संजय दत्तसाठी आता एक नवीन कायद्यातील पळवाट काढलीय. 

१४ दिवसांची फर्लो संपली म्हणून संजय दत्त येरवडा जेलकडे रवाना झाला,  पण जेलमध्ये जाण्याआधीच तो मुंबईला परतला. कारण संजय दत्तने अतिरिक्त फर्लोसाठी केलेल्या अर्जावर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत संजय दत्त जेल बाहेर राहू शकतो, असं त्याला राम शिंदे यांनी सांगितल्याचं संजय दत्तचे वकील रिझवान मर्चंट यांनी सांगितलंय.

धक्कादायक म्हणजे, खुद्द गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी संजय दत्तसाठी संजय दत्तला ही आयडिया दिली होती... त्यामुळे, संजयचे वकील रिझवान मर्चंट यांनी केलेल्या दाव्यावर गृहराज्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. मात्र, यावेळी त्यांनी 'आम्ही कोणालाही अशी सूट देत नाही' असं स्पष्टीकरण देत त्यांनी या प्रकरणातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला.

ही कायद्यातील 'स्पेशल' पळवाट संजय दत्तसाठी काढण्यात आलीय. संजय दत्तने २९ डिसेंबर २०१४ रोजी अतिरिक्त फर्लोसाठी केलेल्या अर्जावर अजून अंतिम निर्णय झाला नाही... आणि जोपर्यंत संजय दत्तच्या या फर्लोवर निर्णय होत नाही तोपर्यंत २८ दिवस संजय दत्त जेलबाहेर राहू शकतो... 

शिवाय, २८ व्या दिवशी संजय दत्तचा वाढीव फर्लोचा अर्ज मंजूर झाला तर त्याला पुन्हा १४ दिवसांची अतिरिक्त रजा मिळेल. म्हणजेच, तो ४२ दिवस बाहेर मजेत काढू शकणार आहे.  ही कायदेशीर नामी शक्कल संजय दत्त साठी शोधून काढण्यात आलीय.

 २४ डिसेंबरला संजय दत्तला १४ दिवसांचा फर्लो मिळाला होता. तो संपण्याआधीच २९ डिसेंबरला संजय दत्तने अतिरिक्त १४ दिवसांच्या फर्लोसाठी अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्यासाठी
मुंबई पोलीसांच्या एनओसीची आवश्यकता असते. पण, ही एनओसी मुंबई पोलिसांनी अजून दिली नाही. 

ही एक प्रकारे संजय दत्तसाठीची कायद्यातील पळवाट असल्याचे कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.