मुंबई : वडाळा येथील भक्तीपार्कमध्ये पल्लवी पूरकायस्थ नावाच्या वकिल तरूणीच्या हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल ऊर्फ सज्जाद पठाण याला मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. दरम्यान, त्याला फाशीची शिक्षा न झाल्याने पल्लवीचे आईवडील वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत.
मुंबई सत्र न्यायालयानं आज ही शिक्षा सुनावली. याप्रकरणी सज्जादला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पल्लवीच्या आईवडिलांनी तसंच विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी केली होती. मात्र कोर्टाने ती मागणी अमान्य केल्यानं पल्लवीचे कुटुंबिय नाराज झालेत.
सज्जादला फाशी द्यावी, यासाठी आता वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं पल्लवीच्या आईवडिलांनी सांगितलं. भक्ती पार्कमधील हिमालयन हाईट्स बिल्डिंगमध्ये राहणा-या पल्लवी पुरकायस्थ या तरुणीची ९ ऑगस्ट २०१२ रोजी हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी जवळपास ४० साक्षीदार तपासण्यात आले आणि ४ हज़ार पानांची चार्जशीट दाखल करण्या़त आली. पल्लवी ज्या इमारतीत राहत होती. त्या इमारतीचा वॉचमन सज्जाद अहमद मुगलने पल्लवीवर बलात्कार करुन तिचा हत्या केली होती. पल्लवी या इमारतीत अविक सेनगुप्ता (26) या आपल्या मित्रासोबत "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होती.
या दोघांचं लग्न होणार होतं, पण नियतीला ते मान्य नव्हतं. पल्लवीच्या हत्येनंतर साक्षीदार अवीकच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या आणि वर्षभरानंतर त्याचाही मृत्यू झाला. पल्लवी ही राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू होती
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.