हार्बर रेल्वेला सापत्न वागणूक

 मध्य रेल्वेचे सावत्र अपत्य अशीच हार्बर रेल्वेची ओळख आहे. कारण रेल्वेमध्ये ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध होतात, त्या सगळ्यात शेवटी हार्बरकडे पोहचतात अशी अवघड परिस्थिती आहे.

Updated: Jul 9, 2014, 01:08 PM IST
हार्बर रेल्वेला सापत्न वागणूक title=

मुंबई : मध्य रेल्वेचे सावत्र अपत्य अशीच हार्बर रेल्वेची ओळख आहे. कारण रेल्वेमध्ये ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध होतात, त्या सगळ्यात शेवटी हार्बरकडे पोहचतात अशी अवघड परिस्थिती आहे.

मुंबई शहरात मुख्य रेल्वेमार्गाला पुरक सेवा म्हणून हार्बर रेल्वे बांधण्यात आली. मात्र नवी मुंबईचा विस्तार आणि गर्दी वाढत गेल्यानं आता हार्बर रेल्वे गर्दीचा मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यामुळे हा मार्ग समस्यांच्या गर्तेत सापडला असून, रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी त्याकडं लक्ष देण्याची गरज आहे.
 
वाढती गर्दी सामावून घेण्यासाठी हार्बर मार्गावरही १२ डब्यांची लोकल सुरु करण्याची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. सीएसटीपासून मानखूर्दपर्यंत रेल्वे स्थांनकांची अवस्था दयनीय असून मुलभूत सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. नवी मुंबईत रेल्वे स्थानकांच्या तिकीटांवर सुरु असलेला अधिभार कधी संपणार असा प्रश्न विचारला जात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्बरच्या या धीम्या मार्गावर सीएसटी ते पनवेल असा जलद मार्ग कधी सुरु होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. गर्दीच्या वेळी कुर्ला लोकल सोडल्यास काही प्रमाणात का होईना, प्रवाशांचा त्रास कमी होऊ शकेल.

मात्र प्रत्येकवेळी हार्बरकडे दुर्लक्ष होत असल्यानं रेल्वे प्रवासी संघटना संताप व्यक्त करत आहेत. याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य चंद्रकांत मोकल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हार्बर मार्गही आता मेनलाइन एवढाच गर्दीचा झालाय. निदान आता तरी हार्बरला दिली जाणारी सावत्र वागणूक संपणार आहे का, असे त्यांचा सवाल आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.