मुंबई : मुंबईत बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा, लोकल ट्रेन, मेट्रो आणि त्यानंतर मोनो रेल हे सार्वजनकि वाहतुकीचे पर्याय एकामागोमाग एक उभे राहिले आणि आता त्याचा पुरेपुर वापर लोकं करत आहेत. आता यामध्ये आणखी एक नव्या वाहतुकीच्या पर्यायाची, नव्या प्रवासी वाहनाची भर पडणार आहे त्याचे नाव आहे 'रोप वे लिंक'.
आपल्याला रायगडचा 'रोप वे' माहीत आहे. यामध्ये जेमतेम आठ प्रवासी एका वेळी प्रवास करु शकतात. आता 'रोप वे लिंक'मध्ये एकाच वेळी ६० ते ७० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असेल... आणि हे 'रोप वे लिंक' हे पूर्णपणे नवीन, भारतातील पहिले प्रवासी वाहतुकीचे साधन ठरणार असून मुंबई ते नवी मुंबई दरम्यान सुरु केले जाणार आहे.
'रोप वे लिंक'चे राज्याातील तीन मार्ग निश्चित करण्यात आले असून दोन मार्ग प्रस्तावित आहेत. रस्ते वाहतुकीला एक पर्यायी मार्ग म्हणून 'रोप वे लिंक'चा विचार केला जात आहे. काही मिनिटांनी उपलब्ध होणारी ही वातानुकुलीत 'रोप वे लिंक' सेवा उपलब्ध असेल आणि गरजेनुसार ती वाढवण्यात येईल. यामुळे लोकलमधून, बेस्टमधून खास करुन खाजगी गाडीतून जाणारे प्रवासी हे या नव्या प्रवासी वाहतुकीच्या पर्यायाकडे 'रोप वे लिंक'कडे वळतील अशी अपेक्षा आहे.
सध्या हे प्रकल्प मुंबई - नवी मुंबईमध्ये राबवण्यासाठी जागतिक पातळीवर प्राथमिक माहिती निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
'रोप वे लिंक'चे मुंबई - नवी मुंबईतील प्रस्तावित मार्ग...
१. वाशी परिसर
- ३.२ किमीचा मार्ग
- ३०० कोटी रुपयांचा प्रकल्प
- ५ स्थानके
- २०१८ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित
२. वाशी ते घाटकोपर
- ८.४ किमीचा मार्ग
- १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प
- ४ स्थानके
- २०१८ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित
३. माथेरान पाया ते माथेरान
- अंदाजे८०० कोटी रुपयांचा प्रकल्प
याशिवाय इतर २४ प्रस्तावित मार्गांचा यात समावेश आहे. यामध्ये, वाशी - सीबीडी बेलापूर प्रस्तावित मार्ग हा १६ किमीचा आणि ठाणे - बोरिवली प्रस्तावित मार्ग हा ४० किमी मार्गाचादेखील समावेश आहे.