मुंबई : नाराज गुरूदास कामत यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गुजरातचे प्रभारीपद काढल्यामुळे गुरुदास कामत नाराज होते. हे पद आता कामत यांच्या ऐवजी अशोक गेहलोतांकडे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे.
काँग्रेस महासमितीचे सरचिटणीस गुरुदास कामत यांनी आज पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कामत यांनी आज निवेदन प्रसिद्ध करत काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांना निवेदनात म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवेळी मी त्यांना मला सर्व पदांवरून मुक्त करण्याबाबत चर्चा केली.
कामत सातत्याने पक्षनेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. त्यांनी उघडपणे ही नाराजी व्यक्त केली होती. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी गुरूदास कामत आणि संजय निरूपम यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. यावेळी कामत यांनी मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरूपम यांना टीकेचे लक्ष्य केले होते.
संजय निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि प्रचारापासून अलिप्त राहिले होते. आता काँग्रेस पक्षाने त्यांच्याकडील गुजरात राज्याचे प्रभारी पद काढून घेतल्याने ते अधिकच दुखावले गेले. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला.