'प्रतापगडाखालची अतिक्रमण हटवा नाहीतर वनात पाठवू'

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणे तात्काळ हटवा अन्यथा तेथील वन अधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवू

Updated: Feb 3, 2017, 09:43 PM IST
'प्रतापगडाखालची अतिक्रमण हटवा नाहीतर वनात पाठवू' title=

मुंबई : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणे तात्काळ हटवा अन्यथा तेथील वन अधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवू, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. अफजल खानच्या कबरी जवळचे अतिक्रमण हटवावं अशी मागणी करणारी जनहित याचिका मिलिंद एकबोटे यांनी दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत तेथील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.

या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने एकबोटे यांनी प्रशासनाविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली होती. ही कबर महसूल विभागाच्या जागेत आहे आणि अतिक्रमणे वन खात्याच्या भूखंडात आहेत, असे याचिकाकर्त्याने सांगितलं. त्यावर न्यायालय चांगलेच संतप्त झाले.

आदेश देऊनही वन अधिकारी कारवाई करत नसतील तर त्यांना तुरंगात शिक्षा भोगायला पाठवायला हवे किंवा त्यांना कायमचे वनातच ठेवायला हवे. जे अधिकारी कारवाई करत नसतील त्यांची नावे न्यायालयात सादर करा, आम्ही योग्य ते आदेश देऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यासाठी एक ठोस कार्यक्रम तयार  करा आणि त्याची माहिती न्यायालयात सादर करा, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.