www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पहिल्याच पावसानं मुंबईला चक्काजाम करून दणका दिला असला, तरी हाच पाऊस एक गुड न्यूजही घेऊन आलाय. यंदा मुंबई महापालिकेच्या सर्व धरणांची पातळी वेळेपेक्षा आधीच चांगली झालीये. १८ जूनच्या आकडेवारीनुसार गेल्या ४ वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या लवकर मुंबईची सर्व धरणं सर्वाधिक भरलीयत.
जुन महिन्यात उत्तर भारताला पुराचा तडाखा देत मान्सूननं दमदार सुरूवात केलीये. 52 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढत पावसानं सगळ्या देशात वेळेच्या आधीच पाय रोवलेत.
पाऊस यंदा जास्त प्रसन्न झालाय, असं म्हणत समाधान मानायचं, की जूनमध्येच ही अवस्था तर नंतर काय होईल या भीतीनं हैराण व्हायचं? कारण यंदा मान्सून संपूर्ण देशात वेळेआधीच पोहोचलाय. केरळमध्ये वेळेवरच आलेला मान्सूनची आगेकूच मात्र सुसाट झाली.
५२ वर्षांचा रेकॉर्ड मोडत पावसानं सगळा देश आपल्या कवेत घेतलाय. यापूर्वी २१ मे १९६१ या दिवशी मान्सून देशभरात पोहोचला होता. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मान्सूनची वेगवान आगेकूच झाली.
पुराच्या तडाख्यात अडकलेला उत्तराखंड आणि यमुनेला लोंढा येण्याच्या भीतीचं सावट असलेल्या दिल्लीला दिलासा मिळण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवलीये. दरवर्षी अंदमान, केरळ, मुंबईमध्ये मान्सून वेळेवर पोहोचतो. नंतर मात्र त्याची चाल धीमी होते. गेल्या काही वर्षांचा हा अनुभव यंदा तरी मोडीत निघालाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.