मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना एकटी लढणार आणि कोणाच्या दाराशी युती करायला जाणार नाही असे घोषीत करून युतीचा काडीमोड केला. यानंतर शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहील का याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे. त्यावर तशी परिस्थिती आल्यास सरकार टिकविण्यासाठी भाजप सक्षम असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
शिवसेनेसोबत युती करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला. शिवसेनेला आमच्याशी युती करायचीच नव्हती. युतीच्या पहिल्या बैठकीत आम्ही पालिकेतील पारदर्शी कारभारासाठी ठोस कार्यक्रम आखण्याची आणि समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर दुसऱ्या बैठकीतही याच मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र, त्यावर सेनेने काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिसऱ्या बैठकीत भाजपने सेनेपुढे ११४ जागांचा प्रस्ताव ठेवला. मात्र, या प्रस्तावावर शिवसेनेने काही उत्तर दिले नाही. यावरून शिवसेनेला आमच्याशी युती करायचीच नव्हती, हे सिद्ध होते, असे दानवे यांनी सांगितले.
याशिवाय, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजप येत्या २८ तारखेच्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.