www.24taas.com,मुंबई
काँग्रेसच्या रजनी पाटील यांची राज्यसभेसाठी बिनविरोध निवड निश्चित झाली. त्यांच्या विरोधात विरोधकांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला.
भाजपचे विनोद तावडे, एकनाथ खडसे तसंच शिवसेनेचे सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांच्या विरोधात युतीतर्फे उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रजनी पाटील यांची निवड निश्चित झाली.
विलासराव देशमुख यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेसाठी पाटील यांच्या नावाची काल काँग्रेसनं घोषणा केली होती. रजनी पाटील या बीडच्या माजी खासदार असून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत.
रजनी पाटील या माजी मंत्री अशोक पाटील यांच्या पत्नी आहेत. पाटील यांचे वडिल आत्माराम पाटील हे स्वातंत्र्यसैनिक होते. बीड मतदारसंघातून १९९६ मध्ये रजनी पाटील यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढली व त्या निवडूनही आल्या.
११ वी लोकसभा बरखास्त झाल्याने त्यांची खासदारकीही क्षणिक ठरली होती. त्यानंतर भाजपला रामराम ठोकून काँग्रेसवासी झालेल्या पाटील यांनी पक्षात अनेक जबाबदा-या यशस्वीपणे सांभाळल्यात.