आज, महाराष्ट्रभर हाय-वे बंद करणार

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे सांगितले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 12, 2014, 06:02 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज ठाकरेंनी यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे बुधवारी १२ फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या मनसे टोलविरुद्ध राज्यभर करणाऱ्या आंदोलनाचं काऊंटडाऊन सुरू झालंय. याच पार्श्वभूमीवर आंदोलनामागची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरेंनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली.
उद्या महाराष्ट्रातील सर्व हाय-वे मनसे बंद करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. स्वत: राज ठाकरे वाशी टोल नाक्यावर धडकणार आहेत. हे आंदोलन फक्त निषेध म्हणून करण्यात येतंय यावेळी मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या जाणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलंय.
'या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो... पण, जे करतोय ते तुमच्यासाठीच, दुसरा पर्याय नाही' असं सांगतानाच राज ठाकरेंनी शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याची गरज नाही, अशी सूचनाही आपल्या कार्यकर्त्यांना केलीय.
यावेळी, टोल प्रश्नाबाबत सरकारनं चर्चेची तयारी दाखवत मनसेला आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन केल्याचं, राज ठाकरेंनी म्हटलंय. पण, चोरीवर दरोडेखोरांशी काय चर्चा करायची? असं म्हणत हे आवाहन धुडकावून लावलंय. सरकारशी कोरड्या चर्चेला काहीच अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलंय.
उद्याच्या आंदोलनानंतर मनसेचा पुढचा मोर्चा असेल तो २१ फेब्रुवारी रोजी... गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानावर मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातले टेम्पो मालकही सरसावले आहेत. महाराष्ट्र राज्य टेम्पो मालक महासंघाच्या सुमारे २७ हजार टेम्पो मालकांनी टोलविरोधातल्या आंदोलनात सहभाग घेतलाय. या संघटनेनं टोलच्या निषेधार्थ उद्या टेम्पो बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.