www.24taas.com, झी मीडिया, पुणे
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारा थंडीचा कडाका अचानक कमी झालाय.आज सकाळी राज्याच्या अनेक भागात पाऊस झाला. यामुळे किमान तापमनामध्ये सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचं चित्र आहे.
लक्षद्वीपपासून ते गुजरातपर्यंत पश्चिम किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा वातावरण बदल झालाय. यामुळे जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक पाउस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.... पुढील ४८ तासांमध्ये हवामान ढगाळ राहणार असल्याचाही पुणे वेध शाळेने वर्तविल आहे.
मुंबईत पावसाचा शिडकावा
मुंबईकरांची आजच्या दिवसाची सुरुवात काहीशी वेगळी झाली.. मुंबईतले चाकरमानी,शाळकरी, आज सकाळी घराबाहेर पडले तेव्हा सूर्यदर्शन नव्हे तर अंगावर पावसाचा शिडकावा झेलत बाहेर पडले ..मुंबई आणि उपनगरात आज सकाळी पावसाचा शिडकावा झाला. गेल्या दोन दिवसांपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होतं. त्यातच आज पहाटे मुंबई शहरासह उपनगर आणि कल्याण डोंबिवली परिसरात पावसाचा शिडकावा झाला.
पावसाच्या शिडकावा आणि ढगाळ वातावरणामुळे मुंबईतून थंडी पळाली. शहरांतले रस्ते निसरडे होण्याइतपत आज पाऊस पडल्याने वाहतूकदारांनाही वाहनं सावकाश चालवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तर काल पहाटेच्या गारठ्यानंतर, मुंबईकरांनी आज दमट हवामान अनुभवलं. वातावरणात झपाट्याने होणा-या या बदलांमुळे सर्दी खोकला तसंच व्हायरल फिवरचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईकरांनो आरोग्य़ सांभाळा असं म्हणण्याची वेळ आलीय...
नाशिकमध्ये पिकांवर परिणाम
नाशिकसह येवला, निफाडमध्येही पावसाच्या हलक्या सरी बरसल्यायत... अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांसहित रब्बी पिंकांवर परिणाम झालाय...
डोंबिवलीत केमिकल लोचा, हिरवा पाऊस
आज अचानक पडलेल्या पावसामुळे डोंबिवलीमधल्या प्रदूषणाचा चेहरा उघड केलाय. मुंबई,ठाण्यासह सर्वत्र पाण्याचा पाऊस होत असताना डोंबिवलीत मात्र हिरव्या विषाचे थेंब जमिनीवर आले...
midc फेज १ ठिकाणी हा हिरवा पाऊस झाला. त्यानंतर सर्वत्र हिरव्या पाण्याची डबकी साचल्याचं चित्र दिसत होतं. डोंबिवलीत असलेल्या प्रदुषणामुळेच हा प्रकार झाल्याचा दावा पर्यावरणंतज्ञांनी केलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही यावर बोलण्यास टाळाटाळ करतायत.
कोकणात हापूसला फटका
कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. थंडीही वाढली आहे.
मात्र, वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे हापूसच्या मोहोरवर तूडतुड्या जातीचा रोग पसरण्याची शक्यता व्यक्त होतेय. आंब्याचा मोहोर वाचवण्यासाठी बागायतदारांची धडपड सुरू आहे. पण नियंत्रण कसं मिळवायचं, असा प्रश्न त्यांना पडलाय...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.