www.24taas.com, मुंबई
मुंबईत आता जरी पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तरीही समुद्रातील भरती-ओहोटीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी भरती येणार आहे. या वेळी लाटांची सरासरी उंची 4.01 मीटर असेल, तर ओहोटी रात्री 8:16 मिनिटांनी असेल. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दरड कोसळ्यानं वाहतूक ठप्प झालीय. मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहतूक खोळंबलीय. कंडेनरही मातीच्या ढिगा-यात अडकलेत. वसईजवळ वाघोबा खिंडीत ही दरड कोसळलीय.
अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर भागात रात्रीपासून संततधार सुरू आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय. कल्याण-बदलापूर रस्त्यावर अंबरनाथ डीएमसी कंपनीजवळ रस्त्यावर पाणी साचल्यानं कल्याण बदलापूर रस्ते वाहतूक विस्कळीत झालीय. मुरबाड शहापूर भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.
कल्याणहून कसारा आणि कर्जत कडं जाणारी रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प झाली. कल्याणजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं वाहतूक ठप्प झाली. डेक्कन एक्स्प्रेस, इंदौर- पुणे एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्याही कल्याण स्टेशनजवळ उभ्या आहेत. त्यामुळं चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. रामबाग परिसरात पाणी साचत असून पाणी साचल्यामुळे रस्ते तसच रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालाय.