राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्याद्वारे काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचं बिगुल वाजवलंय.

Updated: Jan 16, 2016, 10:38 AM IST
राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस title=

मुंबई : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्याद्वारे काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचं बिगुल वाजवलंय. राहुल गांधींच्या दौऱ्याचा आधार घेऊन पक्षातील गटबाजी संपवण्याबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. राहुल गांधींनीही पक्षातील गटबाजी संपवण्यासाठी आपल्या नेत्यांना जाहीर कानपिचक्या दिल्या.

 

राहुल गांधींच्या दौऱ्याच्या आयोजनावरून काही दिवसांपूर्वी हेच नेते काँग्रेसच्या कार्यालयात एकमेकांना भिडले होते. मात्र राहुल गांधींसमोर या नेत्यांनी एकमेकांचे हात हातात घेऊन आपली एकी दाखवण्याचा प्रयत्न केला. मालाड इथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रत्येक नेत्यांनी मुंबई महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसवण्याचे आवाहन करत शिवसेना-भाजपाच्या कारभारावर टीका केली. 

आपल्या छोटेखानी भाषणाची सुरुवात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशी करताना काँग्रेसमधील भांडणे मिटवण्यासाठी काँग्रेस नेत्यांना कानपिचक्याही दिल्या. मुंबई दर्शन या काँग्रेसच्या मुखपत्रात पंडित जवाहरलाल नेहरू आणि सोनिया गांधींबद्दल आक्षेपार्ह लिखाण छापून आल्याप्रकरणी नुकतीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळं या कार्यक्रमाचं निमित्त साधून निरूपम यांनी जाहीर माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधींच्या भाषणापूर्वी संजय निरुपम यांनी केलेल्या भाषणात नारायण राणे आणि गुरुदास कामत यांचे नाव घेणं टाळले. त्यामुळे एकी दाखवण्यासाठी हातात हात घेऊनही या नेत्यांमधील कटुता अजून संपलेली नाही हे स्पष्ट दिसतंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आखलेल्या राहुल गांधींच्या दौऱ्याने मुंबईत काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का हा खरा प्रश्न आहे.