www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात आता सोशल मीडीयावरून राजकारण सुरु झालंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर अतिशय प्रभावी ठरला, पण याच प्रभावी माध्यमाचा गैरवापर महापुरूषांच्या बदनामीसाठी होत असल्यानं गेल्या काही दिवसांत राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत चाललाय. त्यामुळं सोशल मीडियाच्या वापरावर राज्य सरकार काही निर्बंध लागू करण्याच्या विचारात आहे...
अब की बार, मोदी सरकार... ही घोषणा वारंवार गाजली ती सोशल मीडियावर... सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत `मोदी सरकार` सत्तेत आलं. कधी नव्हे एवढा सोशल मीडियाचा गेल्या लोकसभा निवडणुकीत खुबीनं वापर करण्यात आला. मात्र याच सोशल मीडियाने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सामाजिक तेढही निर्माण केलीय..
विशेषतः महापुरूषांच्या बदनामीचा मजकूर या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून झपाट्यानं प्रसारित होतोय. त्यामुळं वादग्रस्त आणि आक्षेपार्ह संदेश पसरवणा-या सोशल मीडियावर काही निर्बंध आणण्याचे संकेत राज्य सरकारनं दिलेत. याबाबत केंद्राकडेही आपण विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल.
सोशल नेटवर्किंग साइट्सवर वादग्रस्त मजकूर टाकणारे, तो मजकूर शेअर किंवा लाइक करून सामाजिक तेढ निर्माण करणा-यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिसांना दिलेत.
विरोधकांनी मात्र राज्य सरकारची ही विनंती धुडकावून लावली आहे... सोशल मीडियावर निर्बंध लागू करण्यास विरोधकांनी आक्षेप घेतलेत...
इंटरनेटच्या जमान्यात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम तर आहेच. पण त्याचा वापर आणि गैरवापर यामधली सीमारेषा फारच पुसट आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, सोशल मीडियावर निर्बंध लादण्यावरून राजकारण चांगलंच रंगू लागलंय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.