www.24taas.com, झी मीडिया , मुंबई
पोलीस भरतीवेळी मृत्यूमुखी पडलेल्या मृत तरुणांच्या कुटुंबीयांना अजूनही मदत मिळालेली नाही. बिलासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यांच्यावर जमीन विकण्याची वेळ आलीय. हीच व्यथा आहे मृत गहिनीनाथ लटपटेच्या कुटुबीयांची.
लटपटे कुटुबीयांना मदतीसाठी वणवण करावी लागतेय.. बीडचा गहिनीनाथ लटपटे पोलीस बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून घरातून निघाला होता.. मात्र मुंबईत पोलीस भरतीदरम्य़ान त्याचा मृत्यू झाला होता.. 18 जूनला गहिनीनाथचा मृत्यू झाल्यानंतर उसणवारी करुन गहिनीनाथच्या कुटुंबीयांनी 2 लाखांचे बिल भरलंय.. सरकारने जाहीर केलेली मदत पोहचणार कधी असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय..
दरम्यान, पोलीस भरती चाचणीदरम्यान मृत्यू झालेल्या राहुल सकपाळ यांच्या कुटुंबियाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांत्वन केलं. विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये सकपाळ यांच्या घरी राज ठाकरे गेले होते. यावेळी ठाकरे यांनी राहुल यांच्या बहिणींना नोकरी देण्याचं आश्वासन दिलंय. तसंच आपण आणि आपला पक्ष सकपाळ यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभं असल्याचं सांगितलं.
या भेटीवेळी स्थानिक मनसे आमदार मंगेश सांगळे तसंच पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस भरती परीक्षा केंद्रावर उमेदवारांसाठी मनसेकडून कोणत्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्यात, याची माहितीही त्यांनी सांगळे आणि पदाधिका-यांकडून घेतली. ठाकरे यांच्या नोकरीबाबत आश्वासनाबद्दल सकपाळ कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय. राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत अद्याप उपलब्ध झाली नसल्याबद्दल सकपाळ कुटुंबियांनी खंत व्यक्त केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.