www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत पोलीस भरती दरम्यान चार उमेदवारांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडालीय. पोलीस भरतीचा चौथा बळी राहुल सपकाळ ठरला आहे. मृत्यू पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे हे मृत्यू झाले असले तरी भरती प्रक्रियेत कुठलीच उणीव नव्हती, असं पोलीस प्रशासनाचं म्हणणंय.
गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवडाभरात गेलेला हा चौथा बळी आहे.
यापूर्वी, मालवणचा अंबादास सोनावणे, विरारचा प्रसाद माळी, नाशिकचा विशाल केदारे या तिघा तरुण उमेदवारांचा मृत्यू झाला आहे.
पिण्यासाठी पाणी नाही. खाण्यासाठी अन्न नाही. रणरणत्या उन्हापासून वाचण्यासाठी डोक्यावर छप्पर नाही आणि त्यात डांबरी रस्त्यावर ५ किलोमीटर धावणं. अशा भीषण परिस्थितीत आपण पाहिलेलं पोलिस भरतीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का असा प्रश्न या ठिकाणी आलेल्या उमेदवारांना पडलाय. पोलीस भरतीसंदर्भातील सर्व नियम धाब्यावर बसवून मुंबईतील काही पोलिस भरती केंद्रांवर चाचण्या घेण्यात येताहेत.
अशातच विक्रोळी केंद्रावर २ उमेदवार उष्मघाताने मृत्युमुखी पडले पण पोलिस प्रशासनाला मात्र त्याची परवाही नव्हती. अंबादास सोनावणे आणि विशाल केदारचा मृत्यू खराब पाणी तसंच उष्माघाताने झाल्याचा अहवाल प्लॅटिनम हॉस्पिटलने दिलाय. या भरती प्रक्रियेबद्दल उमेदवारांकडून संताप व्यक्त होतोय.
या केंद्रांची मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीयांनी देखील पाहणी केली..पण आयुक्त येणार हे कळताच रुग्णवाहिका, स्ट्रेचर, फिरती शौचालयं, प्राथमिक उपचार पेट्या असा सगळा लवाजमा हजर झाला आणि केंद्रावर सर्व काही आलबेल असल्याच भासवल गेलं. पण याबाबत आमच्या प्रतिनिधींनी अधिका-यांना प्रश्न विचारलं तर त्यांनी चक्रावणारी उत्तरं दिलीत.
प्रसारमाध्यमांमधून ही बातमी पसरताच राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी पोलीस मुख्यालयात तातडीची बैठक बोलावली. यामध्ये घडलेल्या प्रकारावर चर्चा झाली. याबाबत एक अहवाल गृहमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. मात्र उमेदवारांच्या मृत्यूला राज्य सरकारच जबाबदार असल्याची टीका माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर यांनी केलीय.
चांगल्या करिअरची स्वप्न घेऊन आलेल्या विशाल केदार आणि अंबादास सोनावणे सारख्या युवकांचा या ढिसाळ नियोजनामुळे बळी गेला.आणखी किती निष्पाप बळी गेल्यानंतर राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाला जाग येणार आहे, असा सवाल सर्वसामान्यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.