www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे मुंबईकरांना त्रास होतोय. त्याबद्दलच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण, त्यांनी ही दिलगिरी व्यक्त करुन २४ तासही उलटत नाहीत, तोच खड्डे बुजवणाऱ्या कंत्राटदारांनी ठाकरे यांची दिलगिरीही खड्ड्यात घातलीय.
खड्ड्यांनी मुंबईच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण केलीय. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जाताना मुंबईकरांचा प्रचंड संताप होतो. त्याचं खापर मुंबई महापालिकेवर फुटतंय. म्हणूनच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वतः या समस्येची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं. सोमवारी रात्री पश्चिम उपनगरातल्या विलेपार्ले, जोगेश्वरी आणि सांताक्रूझ-कलिना भागात त्यांनी खड्डेदर्शन घेतलं. महापौर आणि पालिकेच्या इतर पदाधिकाऱ्यांसह खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या या पाहणी दौऱ्यातून नेमकं काय साध्य झालंय याचा अंदाज तुम्हाला बाहेर पडल्यानंतर नक्कीच येईल.
विलेपार्लेमधल्या या रस्त्यावरचे खड्डे सोमवारी बुजवले गेले पण, मंगळवारी सुर्योदयाबरोबर तेच खड्डे पुन्हा उगवले. तीच कथा जोगेश्वरी पटेल इस्टेट कंपाऊंड, जोगेश्वरी एस.व्ही. रोड आणि सांताक्रूझ पूर्वेच्या कलिनाची... या सगळ्या रस्त्यांवरचे खड्डे सोमवारी बुजवूनसुद्धा मंगळवारी सगळे खड्डे पुन्हा मुंबईकरांना दर्शन द्यायला प्रकट झालेत.
ज्या रस्त्यांवर रात्री खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आलं, त्याच रस्त्यांवर सकाळी पुन्हा खड्डे अवतीर्ण झाले. रस्त्यांची कामं करणारे कंत्राटदार किती निर्ढावलेत याचीच ही साक्ष... साक्षात उद्धव ठाकरेंची दिलगिरीही खड्डयात घालणाऱ्या या कंत्राटदारांवर तरी पालिकेतले सत्ताधीश कारवाई करतील का?
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.