www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महापालिकेच्या एका नव्या फतव्यानं मांसाहार करणा-यांच्या पोटावरच पाय आणलाय... या फतव्यानुसार सप्टेंबर महिन्यातले चार दिवस मांस विक्रीवरच बंदी घालण्यात आलीय... यामुळं मासांहार करणा-यांमध्ये संताप व्यक्त होत असून लोकांच्या भावना लक्षात घेत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यावरून राजकारण सुरू केलंय....
जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वामुळे मांसाहार करणा-यांवर संक्रांत आलीय... जैन धर्मीयांनी केलेल्या विनंतीमुळे महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी 2, 9, 10 आणि 11 सप्टेंबरला मुंबईत कोणत्याही प्रकारच्या मांसविक्रीवर बंदी घातलीय... या फतव्यामुळं मांसाहारी कोळी समाजामध्ये संताप निर्माण झालाय... कोळी भगिनींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली... फतव्याला विरोध करण्यासाठी कोळी समाज रस्त्यावर उतरणार आहे...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या फतव्यावरून महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची खरडपट्टी काढलीय... हा फतवा त्यांना राजकीय खेळी वाटतोय. महापालिकेच्या या फतव्यामुळं शाकाहारी विरूद्ध मांसाहारी असा सामना पुन्हा रंगलाय. कोणत्याही मुद्यावर राजकारण करण्यात पटाईत असलेल्या राजकीय पक्षांना या फतव्यानं नामी संधी उपलब्ध करुन दिलीय... निवडणुकीपूर्वी व्होटबॅँक जपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणारे राजकीय पक्ष हा मुद्दा हातून निसटणार नाही याची काळजी घेताना दिसताहेत...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.