मुंबई : शिवसेना पाकिस्तान विरोधात आपले आंदोलन सुरुच ठेवेल, अशी भूमिका पक्षाची आहे असे स्पष्ट केलेय. सेनेच्या पाकविरोधानंतर टीका झाली. भाजपने तर मित्रपक्षाची खरडपट्टी काढली. मात्र, शिवसेनेने पाकिस्तानच्या मलाला हिचे भारतात स्वागत केले जाईल, असे जाहीर केलेय.
शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या मलाला युसूफजाई भारतात येत असेल तर शिवसेनाही तिचे स्वागत करेल. मललाने पाकिस्तानमधील दहशवादाविरोधात लढा देत स्वत:च्या शरीरावर गोळया झेलल्यात आणि तिचा लढा अद्याप सुरूच आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणालेत.
दरम्यान, आपली मते ठासून मांडण्यासाठी काही जण विध्वंसक कृतीचा हत्यार म्हणून वापर करतात ही अतिशय अस्वस्थ करणारी बाब आहे, असे मत व्यक्त करून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी शिवसेनेवर टीका केली होती.
या प्रकाराला वाढती प्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे त्याच पद्धतीचा अवलंब करण्याचे इतरांना प्रोत्साहन मिळते ही अधिक अस्वस्थ करणारी बाब आहे. त्यामुळे अशा प्रकारची कृती करणाऱ्यांचा निषेध करावयासच हवा, असे जेटली म्हणाले होते.
शिवसेनेने पाकिस्तान कलाकार गुलाम अली, पाकचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे शाहरियार खान यांच्या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला आणि आंदोलन केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.