मुंबई : पाडव्याचा दागिने खरेदीचा मुहूर्त टळला आहे. सराफांची दुकाने अजून बंदच आहेत. दागिन्यांचे पैसे दुष्काळग्रस्तांना देऊ, असा पवित्रा ठाण्यातल्या महिलांनी घेतलाय. तर जळगावमध्ये मात्र सराफा बाजार खुला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावल्यामुळे गेल्या ३७ दिवसांपासून सुरू असलेला सराफा व्यापाऱ्यांचा संप गुढीपाडव्यालाही सुरूच आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी या मुहूर्तावर ग्राहकांना सोने खरेदीपासून वंचित राहावे लागले आहे. संपामुळे व्यापाऱ्यांचे तर नुकसान होत आहेच; पण सरकारचा महसूल बुडतानाच ग्राहकांचाही हिरमोड होत आहे.
दरम्यान, मुंबईत काही ठिकाणी मागच्या दारातून सोने विक्री होत असल्याची कुजबूज सुरु आहे. तर काहींही आज दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविल्याने सुरु होणारी दुकाने सुरुच झालेली नाही. जर कोणी दुकाने उघडी केली तर त्यांच्यावर मोठा दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा सराफा संघटनेने दिल्याने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय काही दुकानदारांनी घेतला.