ओवेसी सभा : सेनेचा पुण्यातील सभेवर आक्षेप मात्र, मुंबईत मौन

पुण्यात ओवेसीच्या सभांवर आक्षेप घेणा-या शिवसेनेनं वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र मौन बाळगलंय. मातोश्रीच्या अंगणात ओवेसी बंधुचा विखारी प्रचार सुरु आहे.

Updated: Apr 5, 2015, 12:03 AM IST
ओवेसी सभा : सेनेचा पुण्यातील सभेवर आक्षेप मात्र, मुंबईत मौन title=

मुंबई : पुण्यात ओवेसीच्या सभांवर आक्षेप घेणा-या शिवसेनेनं वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र मौन बाळगलंय. मातोश्रीच्या अंगणात ओवेसी बंधुचा विखारी प्रचार सुरु आहे.

शिवसेनेचं हे मौन अनेकांना बुचकळ्यात टाकणारं म्हणावं लागेल. ओवेसी बंधूंनी वांद्र्यात तळ ठोकला आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारात सभांचा धडाका लावला आहे. मोदींपासून राणे आणि सर्वच पक्ष लक्ष्य केलं आहे.

वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार तापू लागलाय. शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष इथं चर्चेचा विषय ठरलाय. मात्र या निवडणुकीत डार्कहॉर्स म्हणून एमआयएमकडे पाहिलं जातंय. कारण या मतदारसंघात मुस्लिम मतं निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळंच की काय एमआयएमचे उमेदवार राजा रेहबार खान यांच्या प्रचारासाठी असतउद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी हे बंधू मातोश्रीच्या अंगणात तळ ठोकून बसलेत. 

पुण्यात ओवेसीच्या सभांवर मोर्चा काढत विरोध करणारी शिवसेना मातोश्रीच्या अंगणात होत असलेल्या सभांबाबत मात्र मौन बाळगून आहे.. त्यातच ओवेसी बंधू राणेंवर तुटून पडल्यानं शिवसेनेला गुदगुल्या होणं स्वाभाविक आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच ओवेसी बंधू शिवसेनेविरोधातही प्रक्षोभक बोलतायत. मात्र शिवसेनेकडून त्याला अद्याप उत्तर मिळालेलं नाही.

या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यातच मुस्लिम मतविभाजन शिवसेनेला फायद्याचं ठरणार आहे. मात्र एमआयएमला छुपं प्रोत्साहन म्हणजे विस्तवाशी खेळ तर नाही ना. ज्यात शिवसेनेचेच हात पोळण्याचा धोका जास्त आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.