मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) देशात कांद्याचे भाव वाढणे हे शेतकऱ्यांसाठी एक चांगली बाब म्हणता येईल, मात्र साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचीही गरज आहे.
देशात कांद्याचा भाव वाढला तरी आशिया खंडात हा भाव नंबर तीनवर आहे, कारण सध्या बांगलादेशात कांदा १०३ रूपये किलोने विकला जातोय. तर नेपाळमध्ये ७५ आणि भारतात ७० रूपये किलोने कांदा विकला जातोय. पाकिस्तानात मात्र कांदा हा सर्वात कमी ३२ रूपये किलोने विकला जातोय.
आशियातील कांद्याचे भाव प्रति किलो ( २५ ऑगस्ट २०१५)
१) बांगलादेश १०३
२) नेपाळ ७५
३) भारत ७०
४) पाकिस्तान ३२
कांद्याच्या किंमती वाढल्याने कांदा उत्पादकांना न्याय
कांद्याच्या किंमती वाढल्यानंतर अनेक वर्षांनी कांदा उत्पादकांना न्याय मिळाला आहे, असं म्हणावं लागेल.
साधारणत: पाच सहा वर्षांनी कांद्याचे भाव अचानक वाढतात, मात्र त्यानंतर कांदा लागवड वाढल्याने पुन्हा तीन-चार वर्ष कांदा मातीमोल भावात जातो.
अनेक वेळा कांदा हा फेकून द्यावा लागतो, कारण तो मार्केटपर्यंत पोहोचवण्याचा खर्चही निघू शकत नाही, मात्र कांदा उत्पादकांसाठी हा सोनेरी काळ म्हणावा लागेल.
भाववाढ जास्त काळ टिकणार नाही
उत्तर महाराष्ट्रातील कांद्याचं सर्वात मोठं मार्केट लासलगांवमध्ये कांद्याचा भाव ६० रूपये किलोवर आहे. मागील वर्षी याच महिन्यात हा भाव १५ रूपये किलो होता. मागील वर्षापेक्षा कांद्याच्या भावात ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे, मात्र ही वाढ महिना-दोन महिन्यापेक्षा जास्त काळ टिकत नाही.
कारण कांदा हे साधारणत: साडेतीन-चार महिन्यांचं पिक आहे. यामुळे नवीन कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर भाव गडगडतात.
उत्तर भारतातही ७० रूपये किलो
उत्तर भारतात प्रचंड पाऊस झाल्याने कांद्याचा मोठा तुटवडा हा उत्तर भारतातच आहे. चंदीगड, शिमलाच्या मार्केटमध्ये कांदा ७० ते ८० रूपये किलोवर आहे.
जुलैमध्ये अंदाजे ४० लाख टन कांदा शिल्लक होता, आता १६ ते १७ लाख टन कांदा शिल्लक असल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रचंड पाऊस आणि दुष्काळाचा फटका
कारण, देशातील एका भागात प्रचंड पाऊस आणि दुसऱ्या भागात दुष्काळासारखी परिस्थिती होती, उन्हाळ्याचे शेवटचे दोन महिने आणि पावसाळ्याचे सुरूवातीचे दोन महिने कांद्याचं उत्पादन घेणे वातावरणानुसार शक्य होत नाही. प्रचंड उन आणि प्रचंड पाऊस कांद्याला हानीकारक असतात.
दिल्लीतही कांदा ७०-८० रूपये किलोवर आहे, महिन्याभराआधी दिल्लीत कांदा २५ रूपये किलो होता. कांद्याच्या शोधात दिल्ली सरकारने २५ ट्रक वेगवेगळ्या राज्यात पाठवल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.