देवेंद्र कोल्हटकर, www.24taas.com, मुंबई
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याची तयारी झाली असताना दिल्लीवर तरुणीवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तीचा दुर्देवी मृत्यू या घटनेमुळे अनेक ठिकाणी 31 चे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर अनेक तरुणांनी सामाजिक संदेश देत नव वर्षाचं स्वागत करण्याचं ठरवलं आहे.
देशभरात 31 डिसेंबरला आनंद, उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण असतं. मात्र यंदा अनेक ठिकाणी 31 डिसेंबरला जल्लोष साजरा न करण्याचा निर्णय तरुणाईनं घेतलाय.. दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडित मुलीचा मृत्यू तरुणाईच्या या निर्णयाचं कारण आहे. दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर त्याचा निषेध करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर उतरली होती. पीडित तरुणीची प्रकृती सुधारावी यासाठीही देशभर प्रार्थना सुरू झाल्या. मात्र त्या तरुणीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. तिच्या मृत्यूमुळे सारा देश सुन्न झाला... आणि सगळीकडे संतापाची लाट पसरली... वर्षाअखेर सुन्न करणारी घटना घडल्यामुळे अनेकांनी 31 डिसेंबरचा बेत रद्द केलाय.
अनेक तरुणांनी 31 डिसेंबरला जल्लोष न करता कँडल मार्च काढण्याचा निर्णय घेतलाय. तसंच सामाजिक संदेश देत सरकारचा निषेध करणार असल्याचंही तरुणाईनं म्हटलंय. सामाजिक भान राखत अनेक तरुणांनी नववर्षाचा नेहमीचाच जल्लोष करणं टाळलंय. त्याचबरोबर अशा घटनांसंदर्भातील त्यांचा रोषही लपून राहिलेला दिसत नाही.