महिलेची छेड काढणाऱ्या पाच नेव्ही अधिकाऱ्यांना अटक

बोरीवली पोलिसांनी आज पाच नेव्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलीय. या पाच नेव्ही अधिकाऱ्यांवर वांद्र्यातील पबमध्ये महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 28, 2014, 12:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बोरीवली पोलिसांनी आज पाच नेव्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलीय. या पाच नेव्ही अधिकाऱ्यांवर वांद्र्यातील पबमध्ये महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. गंभीर बाब म्हणजे पबमधील बाउंसर्सनी बेदम चोप देत या रंगेल अधिकाऱ्यांना पबबाहेर हाकलल्यानंतरही या पाचही जणांनी या महिलेचा बोरीवलीपर्यंत पाठलाग केला. महिलेनं धाडस दाखवून १०० नंबरवर कॉल केल्यानं बोरीवली उड्डाणपूलाजवळच पोलिसांनी त्यांना धरलं.
रविवारी १२.३० ते पहाटे ४ च्या दरम्यान ही घटना घडली. ही २५ वर्षीय महिला गुजरातमधील असून बिझनेसमन नवऱ्याबरोबर पाली व्हिलेज इथल्या एका पबमध्ये आली होती. त्यांच्यासोबत त्यांचे दोन मित्रही होते. या पबमध्ये आधीपासूनच हे पाचही अधिकारी होते आणि ते दारूच्या नशेत होते. महिलेकडे पाहून अश्लिल शेरेबोजी केल्यानंतर वादाला तोंड फुटलं. महिलेचा पती व शेरेबाजी करणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये प्रथम धक्काबुक्की झाली त्यानंतर त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं. बिझनेसमन, त्याचे मित्र आणि पाचही अधिकाऱ्यांमध्ये पबमध्येच धुमश्चक्री झाली. त्यानंतर पबच्या बाउंसर्सनी हस्तक्षेप करत रंगेल अधिकाऱ्यांना चोप दिला आणि पबबाहेर काढलं.
तीर्थनाथ दिलिपनाथ (२५), आशिष जयकिसन (२९), महेश्वर सिंग (२६), चंदन मिश्रा (२६), श्याम भंडारे (२९) अशी अटक करण्यात आलेल्या पाच अधिकाऱ्यांची नावं असून ते नेव्हीतील चतुर्थ श्रेणीतील अधिकारी आहेत.
पबमध्ये घडलेल्या प्रकार तिथंच संपला नाही तर दीड वाजताच्या सुमारास हे दाम्पत्य रिक्षानं बोरीवलीकडे जायला निघाले असता पबबाहेर दबा धरून बसलेल्या या पाचही जणांनी दोन रिक्षांमधून त्यांचा पाठलाग केला. जवळपास ४० मिनिटं पश्चिम द्रूतगती महामार्गावर पाठलागाचा हा भयंकर प्रकार सुरू होता. यादरम्यान ज्या रिक्षामध्ये हे दाम्पत्य बसलं होतं त्यावर लोखंडी रॉडनं हल्लेही केले. या प्रकारानं भेदरलेल्या महिलेनं १०० नंबरवर फोन केला.
त्यानंतर काही वेळातच बोरीवलीच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपींच्या रिक्षाला गाठलं. बोरीवली उड्डाणपूलाजवळ या पाचही जणांना अटक करण्यात आली. रविवारी पाचही जणांना सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.