www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी आज शपथ घेतलीय. मधुकर पिचड, दिलीप सोपल, शशिकांत शिंदे या तिंघानी कॅबीनिट मंत्र्यांची शपथ घेतली असून सुरेश धस, उदय सामंत आणि संजय सावकारे यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आलीय.
बबनराव पाचपुते, रामराजे निंबाळकर, गुलाबराव देवकर, लक्ष्मणराव ढोबळे, प्रकाश सोळंके, भास्कर जाधव या सहा मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती करण्यात आलीय.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गाजावाजा करत सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते, मात्र आजच्या फेरबदला धा़डसी निर्णय घेणे पवार यांनी टाळले आहे. त्यामुळे हा बदल करुन राष्ट्रवादीने काय साधले असा प्रश्न निर्माण झालाय.
सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले आणि यापूर्वी दोनदा आदिवासी विकास मंत्रीपद भूषवलेले मधुकर पिचड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. सोलापूरच्या बार्शी मतदार संघाचे दिलीप सोपल यांची मंत्रिमंडळात वर्णी लागलीये. सोपल यांच्यामुळे राष्ट्रवादीला माढा आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी फायदा होणार आहे.
रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना बढती देताना त्यांच्या पदरात राज्यमंत्री पद टाकण्यात आले आहे. सामंत आणि पालकमंत्री भास्कर जाधव यांच्यात राजकीय शीतयुध्द सुरू आहे. सामंत हे नाराज होते. त्यांना युवकचे प्रदेश अध्यक्षपद बहाल करण्यात आले. तरीही रत्नागिरीत गटबाजी कायम होती. त्यामुळेच येत्या निवडणुकीत काहीही दगाबाजी होऊ नये म्हणून त्यांना मंत्री पद दिल्याचे बोलले जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.