मुंबई : राष्ट्रीय राजकारणात मोदी नावाचं वादळ आलं आणि राजकारणातले अनेक भले मोठे दिग्गज वृक्षही उन्मळून पडले. यानंतर प्रादेशिक राजकारणातही तो दबदबा दिसेल का हा प्रश्न आहे. कारण बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितिश कुमारही आता एकाच मंचावर दिसायला लागले आहेत.
महाराष्ट्रात मोदी नावाचं वादळ रोखण्यासाठी काँग्रेस-एनसीपी-एसपी-बीएसपी यांची आघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ येतेय आणि राजकीय विरोधक आणि मित्र पक्षांमध्ये मोठी सुंदोपसुंदी पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात भाजप नेते अमित शाह यांनी वेळोवेळी लक्ष देण्यास सुरूवात केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या झोपेचं खोबरं झालं आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी 242 जागांवर आघाडी मिळाली होती. यावेळी भाजप-शिवसेनेसोबत आरपीआय आठवले गट, स्वामिनानी शेतकरी संघटना या सारख्या संघटना आहेत.
यावेळी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आघाडीचे दरवाजे सताड उघडे ठेवले आहेत. बिहार मॉडेलचा पुढचा प्रयोग महाराष्ट्रात होणार आहे. बंद दारामागे आघाडीला शेवटचं रूप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी म्हणतात, सेक्यूलर मतं एकत्र राहण्यासाठी, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत येण्यास आम्ही तयार आहोत.
अल्पसंख्याकांवर बऱ्यापैकी प्रभाव असणाऱ्या समाजवादी पक्षाने 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कुणाशीही आघाडी न करता चार जागा जिंकल्या होत्या, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीला आठ ठिकाणी पराभूत करण्यास कारणीभूत ठरले होते.
बीएसपीला एकूण सहा टक्के मतं मिळाली होती. मायावतींच्या बसपाला विदर्भात चांगली मतं मिळतात. आघाडीत बसपा आल्यास ही मतं विरोधकांवर प्रभावी ठरतील आणि आरपीआय आठवले गटालाही मात देता येईल, तसेच काँग्रेसला बसपापासून होणारं नुकसानंही यामुळे वाचणार आहे.
सध्या सर्व सत्ताधारी पक्षांपुढे सरकार वाचवण्याचं मोठं आव्हान यावेळी आहे. या आघाडीला राज ठाकरे यांच्याकडून अप्रत्यक्षपणे मागील निवडणुकीत फायदा झाला, तसा फायदा होण्याची अपेक्षा आहे. मनसेला गेलेल्या मतांमुळे शिवसेना आणि भाजपला 50 जागांवर फटका बसला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.