मुंबई : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुंबईत प्रचार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. संजय निरुपम हे मुंबईत प्रचार करण्यासाठी सक्षम आहेत, त्यामुळे आपण मुंबईबाहेर प्रचार करू असं वक्तव्य राणेंनी केलं आहे. राणेंच्या या भूमिकेमुळे ते संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत का अशी चर्चा सुरु झाली आहे.
शरद पवार यांनी निरुपम यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल बोलायला नारायण राणेंनी नकार दिला आहे. संजय निरुपम हा मूर्ख माणूस आहे, त्याचं महाराष्ट्रामध्ये योगदान काय आहे, अशी बोचरी टीका पवारांनी केली होती.
दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये भाजपशी युती तोडणाऱ्या शिवसेनेचाही राणेंनी खरपूस समाचार घेतला आहे. शिवसेना पक्ष बिथरला आहे, खिशात राजीनामे असण्यापेक्षा त्यांनी राजीनामा द्यावा असं थेट आव्हान राणेंनी शिवसेनेला केलं आहे. सत्तेचा लाभ घ्यायचा आणि टीका करायची ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे, असंही राणे म्हणाले आहेत.