विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

 मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेवर जाणा-या दोन सदस्यासांठी रविवारी निवडणूक होतेय.

Updated: Dec 27, 2015, 09:35 AM IST
विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात title=

मुंबई :  मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेवर जाणा-या दोन सदस्यासांठी रविवारी निवडणूक होतेय. शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे अशोक उर्फ भाई जगताप आणि अपक्ष उमेदवार प्रसाद लाड या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद लाड यांनी पक्षाशी बंडखोरी करीत निवडणुकीत प्रवेश केल्यानं चुरस वाढलीय. 

शिवसेना-भाजप ही निवडणूक युतीमध्ये लढवत आहे. दोन्ही पक्षाचे नगरसेवक फक्त पहिल्या पसंतीचीच मते देणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला रामदास कदम यांच्या हमखास विजयाची खात्री आहे. काँग्रेस एनसीपीनंही आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय, पण लाड यांनी उमेदवारी कायम ठेवल्यानं दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढलीय. 

लाड यांच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं त्यांच्यामागे एनसीपीतीतल्याच एका गटाचं पाठबळ तर नाही ना असा काँग्रेसला संशय आहे. या निवडणुकीत मनसेनं तटस्थ राहाण्याची भूमिका घेतल्यानं विजयाची समीकरणं बदललीत... पूर्वी विजयासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या पसंतीच्या ७६ मतांचा कोटा आता ६७ वर आलाय. 

या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यांनीही मतदानाचा अधिकार असल्यानं मतदारांची संख्या २३० इतकी निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेतल्या पाठिंब्यासह पक्षीय बळ लक्षात घेतल्यास 

मुंबई महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल 

शिवसेनेचे ८८ 
भाजपचे ३१ 
मनसेचे २८
काँग्रेसचे ५२
राष्ट्रवादी काँग्रेसचे १४ 
समाजवादी पक्षाचे ८ आणि 
अन्य ९ नगरसेवक आहेत. 

अपक्ष उमेदवारामुळे निवडणूकीत चुरस निर्माण झाली असली तरी घोडेबाजारही तेजीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. नगरसेवकांना प्रलोभनं, अमिषं दाखवली जाताहेत. त्यामुळे मतं फटू नयेत याची काळजी घेत सर्वच राजकीय पक्षांनी नगरसेवकांना व्हिप बजावलाय. राजकीय पक्षांनी आपआपल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी ठेवलंय. विशेष करुन शिवसेना आणि काँग्रेस याबाबत अधिक सावध आहे. काँग्रेसचे नगरसेवक चार दिवसांचा दिव-दमणचा पाहुणचार घेऊन आता मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झालेत. तर शिवसेना नगरसेवकांना मालाडच्या रिट्रिट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. दम्यान प्रत्येक उमेदवार आपल्याच विजयाची खात्री देतोय. मात्र 30 डिसेंबरला मतमोजणीच्या दिवशीच नगरसेवकांच्या निष्ठेवर ख-या अर्थानं शिक्कामोर्तब होईल.