मुंबई : मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाची उद्या म्हणजेच २५ जूनपासून भाडेवाढ करण्यात येणार आहे. भाडेवाढ करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील लाखवला आहे.
टॅक्सी, रिक्षा भाडेवाढीला स्थगिती मिळवण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने न्यायालयात दाखल केलेली याचिका बुधवारी फेटाळण्यात आली. त्यामुळे राज्यभरात उद्यापासून होऊ घातलेल्या टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
टॅक्सी-रिक्षा भाडेवाढीची शिफारस करणारी हकीम समिती रद्द करण्यात आली. त्यानंतर नवी समिती स्थापण्यात येणार आहे. नवी समिती भाडेवाढीसंदर्भात अहवाल सादर करेपर्यंत प्रस्तावित भाडेवाढीला स्थगिती देण्याचा आपला कुठलाही मानस नाही. उलट रिकॅलिब्रेशनची सुरुवात २५ जूनपासून सुरु केली जाणार आहे. तेव्हापासूनच नव्या भाडेवाढीच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते.
मात्र सरकारच्या या निर्णयाला हिरवा कंदील न्यायालयाने दाखविला नाही. प्रस्तावित भाडेवाढीला मंजुरी देण्याच्या मागणीसाठी सरकारने याचिका केली होती, तर हकीम समितीच रद्द करण्यात आल्याने आणि नव्या समितीला अहवाल देण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने ही भाडेवाढही तोपर्यंत लागू करू नये, या मागणीसाठी मुंबई ग्राहक पंचायतीनेही न्यायालयात धाव घेतली होती.
ग्राहक पंचायतीतर्फे रिक्षा-टॅक्सी संघटनांतर्फे पुकारण्यात आलेल्या संपाविरोधात अवमान याचिका करण्यात आली होती. मात्र नव्या समितीच्या शासननिर्णयात नव्या भाडेवाढीबाबत काहीच नमूद नसल्याकडे ग्राहक पंचायतीने लक्ष वेधले होते. त्यावर प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका मांडण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.