मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार झटका बसलाय. शिवसेनेच्या तिघा ज्येष्ठ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्याशिवाय ठिकठिकाणी शिवसेनेला बंडखोरीनं ग्रासलं असून, बंडोबांना थंडोबा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानिमित्त बंडखोर विरूद्ध निष्ठावंत शिवसैनिक असा सामना सुरू झालाय.
ज्याची भीती होती, शेवटी तेच झालं. उमेदवारांची नावं जाहीर होताच सत्ताधारी शिवसेनेला बंडखोरीचं ग्रहण लागलंय. कालपर्यंत शिवबंधन हातात घालून निष्ठेचे पोवाडे गाणारे, निवडणुकीचं तिकीट न मिळाल्यानं बंडखोर झालेत. शिवसेनेचे माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे, लालबाग-परळमधील कार्यतत्पर नगरसेवक नाना आंबोले आणि चेंबूरमधले विद्यमान नगरसेवक दिनेश पांचाळ यांनी तर थेट भाजपमध्येच प्रवेश केला आहे.
वडाळा, दादर-हिंदमाता, लोअरपरळ परिसरातल्या नाराज इच्छुक नाराजांना 'मातोश्री' वर पाचारण करण्यात आले आहे. नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मातोश्रीवर नाराजीनामा नाट्य सुरुच आहे. वडाळ्यात वॉर्ड क्रमांक 178 मधून युवासेनेचे अमेय घोले यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी स्थानिक शिवसैनिकांनी शाखेला टाळ ठोकलं. रस्त्यावर उतरून त्यांनी निदर्शन केली.
वडाळ्यापाठोपाठ हिंदमाता परिसरातल्या शाखेलाही शिवसैनिकांनी टाळं ठोकलं. प्रभाग क्रमांक 200 मध्ये उर्मिला पांचाळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण त्यांचा पक्षाशी संबंध नसल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांनी केला आहे.
दादरच्या बालेकिल्ल्यातही शिवसेनेला झटका बसलाय. आमदारपुत्र समाधान सरवणकर यांच्या उमेदवारीमुळे माजी शाखाप्रमुख महेश सावंत नाराज आहेत. प्रभाग क्रमांक 199 मधून शेजारच्या वॉर्डातल्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिल्यानं स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.
तिथं शाखाप्रमुख राजेश कुसळे यांच्या पत्नी इच्छुक होत्या. या सगळ्या नाराज शिवसैनिकांची समजूत काढण्यासाठी त्यांना मातोश्रीवर बोलवून घेण्यात आले आहे. शिवसेनेचं नेतृत्व या बंडोबांची कशी समजूत घालतं, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपतेय. त्याआधीच ही बंडखोरी शमली नाही तर निवडणुकीत त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.